बँक ऑफ महाराष्ट्रचे सीएमडी रवींद्र मराठेंच्या जामिनावरील सुनावणी उद्यावर
डीएसके प्रकरणात अटक करण्यात आलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि सीईओ रवींद्र मराठे यांच्या जामिनावरील सुनावणी उद्या (बुधवारी) होणार आहे.
![बँक ऑफ महाराष्ट्रचे सीएमडी रवींद्र मराठेंच्या जामिनावरील सुनावणी उद्यावर pune session court to hear tomorrow on bom cmd ravindra marathes bail plea update बँक ऑफ महाराष्ट्रचे सीएमडी रवींद्र मराठेंच्या जामिनावरील सुनावणी उद्यावर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/25175235/ravindra-marathe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : डीएसके प्रकरणात अटक करण्यात आलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि सीईओ रवींद्र मराठे यांच्या जामिनावरील सुनावणी उद्या (बुधवारी) होणार आहे. न्यायमूर्ती आर एन सरदेसाई न्यायालयात गैरहजर राहिल्याने जामिनावरील सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे.
तसेच रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज निकाल आला असता तर इतर आरोपींच्या जामिनावर ही परिणाम होण्याची शक्यता होती. उद्या सरकारी वकील प्रवीण चव्हाणही न्यायालयात हजर राहणार आहेत.
रवींद्र मराठे यांची चौकशी पूर्ण झाली असून आवश्यक ती कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यामुळे मराठे यांना जामीन देण्यात यावा, असं सरकारी वकिलांनी पुणे सत्र न्यायालयात सोमवारी सांगितलं होतं. त्यामुळे रवींद्र मराठे यांच्यासह इतर पाच आरोपींच्या जामीन अर्जावरही उद्या सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण? बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या प्रकरणात बुधवारी मोठी कारवाई करण्यात आली होती. बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली. अधिकाराचा गैरवापर करत, नियम डावलून डीएसकेंच्या नसलेल्या कंपन्यांना कर्ज दिल्याचा ठपका या बँक अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली होती.
अटक केलेल्यांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांचाही समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्र बँकेचे तत्कालीन क्षेत्रीय व्यवस्थापक एन एस देशपांडे, बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, बँकेचे कार्यकारी संचालक आर के गुप्ता, डी एस कुलकर्णी यांच्या कंपन्यांचे मुख्य अभियंता राजीव नेवासकर, डी एस कुलकर्णी यांचे सीए सुनील घाटपांडे यांना आज अटक झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)