Pune School : कुणी शिक्षक देता का? शिक्षक! शिक्षणाच्या माहेरघरात शाळेत शिक्षकच नाही....
शिक्षणाचे माहेरघर अशी पुणे शहराची ओळख आहे..मात्र याच पुणे शहरात असलेल्या महापालिकेच्या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Pune School : शिक्षणाचे माहेरघर अशी पुणे शहराची ओळख आहे. मात्र याच पुणे शहरात असलेल्या महापालिकेच्या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिक्षक नसल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे शिवाय विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. शाळेत येतो पण शिकवायला शिक्षकच नाही तर मग आम्ही शिकणार कसं?, असा प्रश्न शिक्षक उपस्थित करताना दिसत आहे.
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात कल्पना चावला इंग्लिश मीडियम स्कूल आहे. महापालिकेची ही शाळा आहे. या शाळेची सुंदर इमारत आहे आणि शाळेत शैक्षणिक साहित्यही आहे. मात्र शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच नाही. या शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग भरवले जातात. 200 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात आणि या सात वर्गासाठी फक्त दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची संख्या घटली...
या शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे आता विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी होत चालली आहे. आधी या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 300 पेक्षा जास्त होती मात्र आता ही 200 पर्यंत येऊन पोहोचली आहे. फक्त दोन शिक्षक असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे वर्ग एकत्रच भरवले जातात. म्हणजे दुसरीचे विद्यार्थी तिसरीच्या वर्गात चौथीचे विद्यार्थी पाचवीच्या वर्गात अशा प्रकारे विद्यार्थ्यांना एकत्र बसवलं जातं. त्यामुळे वर्गात नेमकं काय चाललंय? हेच विद्यार्थ्यांना कळत नाही आहे.
विद्यार्थीच बनले शिक्षक...
शिक्षक नसल्यामुळे सातवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थीच पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक बनतात. त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा ते प्रयत्न करतात. सातवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्यामुळे हे विद्यार्थी देखील दिवसभर येऊन वर्गात बसतात, मजा मस्ती करतात, तर काही विद्यार्थी पहिली दुसरी तिसरीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून शिकवतात. सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अक्षरशः विनंती केली आहे की, आम्हालाही शिक्षण घ्यायचं आहे त्यासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी. शिक्षकांसाठी अक्षरशः भीक मागण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे.
विद्यार्थी शिकणार कसे?
पुणे शहरात एकीकडे खाजगी शाळा मोठ्या प्रमाणात आहेत. लाखो रुपयांची फी घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. मात्र ज्यांना लाखो रुपयांची फी देणे शक्य नसते ते महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेतात. मात्र महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षकच नसतील तर या गरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचं तरी कसं?, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
हेही वाचा-