(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ललित पाटील प्रकरणानंतर कारागृह प्रशासन जागे; ससून रुग्णालयातून 12 कैद्यांची पुन्हा येरवडा जेलमध्ये रवानगी
Pune Sasoon Hospital: ससूनच्या 16 नंबर वॉर्डमधून 12 कैद्यांना पुन्हा येरवडा कारागृहात हलवण्यात आले आहे
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातून (SASOON HOSPITAL DRUG RACKET) ललित पाटील (Lalit Patil) हा ड्रग माफिया पळून गेल्यानंतर ससूनच्या 16 नंबर वॉर्डमध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपी उपचारांच्या नावाखाली ठाण मांडून बसल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर ससूनच्या तीन सदस्यीय डॉक्टरांच्या टीमने या कैद्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना ससूनमध्ये ठेवण्याची गरज आहे का याबद्दल अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. समितीने काल संध्याकाळी अहवाल सादर केला. मात्र त्याआधीच ससूनच्या 16 नंबर वॉर्डमधून 12 कैद्यांना पुन्हा येरवडा कारागृहात हलवण्यात आले आहे. यामधे माजी आमदार अनिल भोसले, गँगस्टर रुपेश मारणे, हेमंत पाटील यांचा समावेश आहे.
पुण्यातील ससून रुग्णालय हे पैसेवाल्याआरोपींचे दुसरे घर बनले आहे. येरवडा कारागृहात कैदेत राहण्याचं टाळण्यासाठी हे आरोपी उपचारांचं कारण देऊन ससून रुग्णालयात भरती होतात आणि पुढे ते ससूनमधेच तळ ठोकतात . त्यासाठी येरवडा कारागृहातील अधिकारी आणि ससूनमधील अधिकारी यांना लक्ष्मी दर्शन घडवलं जातं. ड्रग माफिया ललित पाटील हा ससूनमध्ये पोलिसांच्या पहाऱ्यात राहूनच ड्रॅग रॅकेट चालवत होता आणि त्यासाठी त्याला मोबाईल फोन आणि इतर सगळ्या आवश्यक गोष्टी मिळत होत्या . एवढंच काय तर कोट्यवधी रुपयांचं ड्रॅग देखील त्यानं जवळ बाळगलं होतं. हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली त्यानंतर कारागृह प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरूवात केली. माजी आमदार अनिल भोसले, गँगस्टर रुपेश मारणे, हेमंत पाटील यांच्यासह 12 रुग्णांची आता थेट कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
अनिल भोसले
राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल भोसले हे बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात आणि ठेवीदारांचे पैसे बुडवल्याच्या आरोपाखाली अटकेत आहे. मात्र गेल्या 130 दिवसांपासून म्हणजे जवळपास चार महिने त्यांचा मुक्काम पुण्यातील येरवडा कारागृहाऐवजी ससूनच्या 16 नंबर वॉर्डमध्ये आहे .
हेमंत पाटील
खंडणी , अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यातील या आरोपीवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आलीय . मात्र तो देखील गेले 41 दिवस ससूनमध्ये राहतोय.
गँगस्टर रुपेश मारणे
पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याचा पुतण्या रुपेश मारणे हा देखील ससूनमध्ये 47 दिवस तळ ठोकून आहे.
ललित पाटील देखील जून महिन्यापासून ससून रुग्णालयात तळ ठोकून होता .येरवडा कारागृहातील अधिकारी आणि डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करणायचा अभिप्राय दिल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात आणण्यात आलं होत . त्याच्यावर कधी टीबीचे कधी अल्सरचे उपचार करायचे आहेत असं सांगण्यात आलं. तर ड्रॅग रॅकेट चालवताना सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच हर्नियाच ऑपरेशन करण्याची शिफारस ससूनमधील डॉक्टरांनी केली होती आणि त्या दरम्यानच तो पळून गेला होता .
हे ही वाचा :
Sasoon hospital drug racket : बायको वकील, बसल्याजागी करायचा लाखोंचा व्यावहार; ससूनमधून पळालेल्या ललित पाटीलच्या ड्रग्स रॅकेटची A to Z कहाणी