Pune Rain: तुफान बॅटिंगनंतर पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाची विश्रांती; 24 तासांत तब्बल 239 मिमी पावसाची नोंद, पर्यटनस्थळे बंद
Pune Rain: पुण्यासह पिंपरी, चिंचवड, लोणावळा या भागांमध्ये देखील पावसाची तुफान बॅटिंग केली आहे. मात्र या भागांमध्ये रात्री पासून पावसाने विश्रांती घेतली आहे.

पुणे: मुसळधार पावसाने गेली दोन दिवस पुणे जिल्ह्याला झोडपलं आहे, काल (गुरुवारी) पुण्यात पावसाने (Pune Rain) गेल्या 32 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे, काल शहर परिसरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आलं. मुसळधार पावसानं पुणेकरांचं मोठं नुकसानं झालं आहे, अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्यात आला आहे. दरम्यान आज शुक्रवारी पुण्यात पावसाने विश्रांती (Pune Rain Update) घेतली आहे. पुण्यासह पिंपरी, चिंचवड, लोणावळा या भागांमध्ये देखील पावसाची (Heavy Rain) तुफान बॅटिंग केली आहे. मात्र या भागांमध्ये रात्री पासून पावसाने विश्रांती घेतली आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल 239 मिलिमीटर इतका पाऊस बरसला आहे. म्हणजे 9.41 इंच इतका पाऊस कोसळला आहे. या 1 जून पासून 3210 मिलीमीटर इतका पाऊस बरसला आहे, गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2760 मिलीमीटर पावसाची (Heavy Rain) नोंद झाली होती. रात्री पासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे.
पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद
शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, घोकायदायक ठिकाणे पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील खेड, जुन्नर आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा परिसरातही मुसळधार पाऊस पडला आहे. या ठिकाणच्या सर्व शाळांना सुटी देखील देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिसरात खासगी ऑफिसना आदेश दिल्यानंतर सुटी जाहीर करण्यात आली. सर्व सरकारी कार्यालये सुरू आहेत. मुळशी तालुक्यात ताम्हिणी घाटात दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. त्यामुळे ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पुणे, पिंपरीतील शाळा, महाविद्यालयाना आज सुट्टी
पुण्याला हवामान विभागाने शुक्रवारी आज (ऑरेंज अलर्ट) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माध्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. सुट्टीच्या कालावधीत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे अशा ही सूचना केल्या आहेत.
पवना धरण क्षेत्रात तब्बल 12 टक्के पाणी साठ्याची वाढ
पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण क्षेत्रात ही काल पावसाने तुफान बॅटिंग केली. यामुळं धरणाच्या पाणी साठ्यात तब्बल 12 टक्क्यांनी वाढ झाली. आज धरणात 79 टक्के पाणी साठा झालाय, काल सकाळपर्यंत धरणात 67 टक्के पाणी साठा होता. परवा 374 मिलीमीटर पाऊस कोसळला अन 10 टक्के पाणी साठ्यात वाढ झाली, त्या तुलनेत काल 167 मिलीमीटर पाऊस बरसला, मात्र धरण साठ्यात 12 टक्के पाण्याची वाढ झाली. त्यामुळं पिंपरी चिंचवडकरांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
