Pune Political News : कोण उंदीर? कोण बँडवाले?; राष्ट्रवादी -मनसेच्या शहराध्यक्षांमध्ये पुन्हा ट्विटर वॉर
पुण्यात सध्या मनसे विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असल्याचं चित्र आहे. दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांकडून ट्विटर वॉर सुरु आहे. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांना बॅंडवाल्यांची उपमा दिली आहे.
Pune Political News : पुण्यात सध्या मनसे (MNS) विरुद्ध राष्ट्रवादी (NCP) अशी लढत असल्याचं चित्र आहे. दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांकडून ट्विटर वॉर सुरु आहे. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath babar) यांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांना बॅंडवाल्यांची उपमा दिली आहे. तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant jagtap) यांनी मनसेच्या शहराध्यक्षांना उंदराची उपमा दिली आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. पुण्यात पोटनिवडणुकीचं वातावरण आहे. मात्र निवडणूक एकीकडे सुरु आहे आणि दुसरीकडे या दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरु आहे.
काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि चिन्ह दोन्ही मिळालं. मात्र त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना शिवसेना यासंदर्भात भूमिका स्पष्ट करेल असं मत व्यक्त केलं. त्यावरुन मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांंना डिवचलं आहे. त्यांनी ट्वीट करत जगतापांना बॅंडवाल्याची उपमा दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, "आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे सोबत आहोत" कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. हे टायटॅनिक पिक्चरमधले तेच ऑर्केस्ट्रावाले आहेत जे पूर्ण जहाज बुडेपर्यंत बँड वाजवत बसले होते ....', असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहून जगतापांना डिवचलं आहे.
त्यासोबत या ट्वीटवर प्रशांत जगतापांनीही बाबर यांची चांगलीच हजेरी घेतली आहे. त्यांनी बाबर यांना किंवा मनसेच्या नेत्यांना उंदराची उपमा दिली आहे. त्यामुळे दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं बघायला मिळत आहे. त्यांनी ट्विटमध्ये मनसेचा उल्लेख उंदीर म्हणून केला आहे. 'आठवतंय, सगळ्यात आधी उंदीर जहाजातून पळाले होते.' असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
आठवतंय
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 20, 2023
सगळ्यात आधी उंदीर जहाजातून पळाले होते. https://t.co/vXlXhhzs0s
काही दिवसांपूर्वीही दोघांमध्ये असंच ट्विटर वॉर बघायला मिळालं होतं. त्यावेळी मनसेने पुण्याच्या पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला त्यावरुन एकमेकांवर भिडले होते. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी प्रशांत जगताप यांच्यावर टीका केली होती कसब्यात महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसला रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी राष्ट्रवादीला देण्यात आली नसल्याने मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी प्रशांत जगतापांवर चांगलाच हल्लाबोल केला होता. त्यांच्याच ट्वीटला राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांनीदेखील सडेतोड उत्तर दिलं होतं. साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा ?? शुद्धीवर ये. तुझ्या सायबाने सुपारी घेतली आहे. तू फक्त मन लावून नाचायचं काम कर, अशा शब्दांत त्यांनी ट्वीट केलं होतं आणि यात अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांच्यावर जगतापांनी टीका केली होती.