Sharad Pawar Baramati Loksabha : अजित पवारांचे मेळावे पाहून शरद पवारांचं आता 'मिशन बारामती'; पदाधिकाऱ्यांच्या धडाधड बैठका घेणार
बारामती लोकसभा मतदार संघात सध्या पवार घराण्यातील नणंद विरुद्ध भावजय या उमेदवारीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. याच मतदार संघात आता शरद पवार अॅक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे.
बारामती, पुणे : बारामती लोकसभा मतदार (LokSabha Election 2024) संघात सध्या पवार घराण्यातील नणंद विरुद्ध भावजय या उमेदवारीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. अजित पवार (Ajit Pawar) बारामतीतील प्रत्येक गावात मेळावे घेत असताना याच मतदार संघात आता शरद पवार (Sharad Pawar) अॅक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदार संघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. त्यासोबतच अजित पवार यांच्याकडून मतदारांना वळवण्याचं काम सातत्याने सुरु आहे. त्यातच आता शरद पवारांना बारामतीसाठी किंवा निवडणुकीसाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. हे शरद पवारांसमोर मोठं आव्हान असल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका लावला आहे.
दौंड, इंदापुर,,बारामती, पुरंदर भोर, खड़कवासला हे सहा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतात. त्यात बारामती राष्ट्रवादीकडून अजित पवार, इंदापूरमध्ये राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे, दौंडमधून भाजपचे राहुल कूल, पुरंदर मधून कॉंग्रेसचे संजय जगताप आणि भोर-वेल्हामधून कॉंग्रेसचे संग्राम थोपटे आणि खडकवासल्यातून भीमराव तापकीर निवडून आलेले आहेत. यातील दोन कॉंग्रेसचे आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. त्यामुळे ते दोन आमदार सुप्रिया सुळेंच्या बाजूने असतील. मात्र इतर ठिकाणी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना निवडणुकीसाठी नवी यंत्रणा उभारावी लागणार आहे.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामागे आधीचे अनेक कार्यकर्ते आहेत. मात्र अनेक कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे. अजित पवारांनी गावपातळीवर सभा घ्यायला सुरुवात केली आहे. खडकवासला, इंदापूर असे काही मतदारसंघ अजित पवार पिंजून काढत आहेत. अजित पवारांचे हे मेळावे पाहून आता शरद पवार कामी लागले आहेत. त्यांना बारामती मतदारसंघात लक्ष घालावं लागत आहे.
पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठका
पुण्यात या पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहे. या बैठकांमध्ये पक्षाची आणि लोकसभा निवडणुकींची रणनिती ठरवण्यात येणार आहे. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याकडून बैठक घेण्यात येणार आहे. त्यासोबतच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनदेखील करण्यात येणार आहे. या लोकसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांना आता नवी फळी तयार करुन कामाला लावावी लागणार आहे. बारामतीत यंदा नणंद भावजय आमने-सामने उभ्या ठाकणार असल्याने या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याच्या वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
इतर महत्वाची बातमी-