Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात गणेशोत्सव काळात ड्रोनवर बंदी, सुरक्षेच्या कारणात्सव पोलिसांची खबरदारी
Pune Drone Banned : पुण्यात गणेशोत्सव काळात ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवात सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून पुणे शहरात ड्रोन बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
पुणे (Pune) : पुण्यात गणेशोत्सवदरम्यान (Ganeshotsav 2023) ड्रोनच्या (Drone) सहाय्याने व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करणं महागात पडू शकतं. पुण्यात गणेशोत्सव काळात ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवात सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून पुणे शहरात ड्रोन बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक ड्रोन व्हिज्युअल्स अपलोड झाल्याचं विशेष शाखेच्या पथकाच्या निदर्शनास आलं. त्यानंतर पुणे शहर पोलिसांनी गणेशोत्सव काळात ड्रोनचा वापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर पोलिसांनी आदेश जारी करुन सुरक्षेच्या कारणास्तव गणेशोत्सव काळात ड्रोनच्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र शहर पोलीस पाळत ठेवण्यासाठी वापरत असलेल्या ड्रोन आणि उडत्या वस्तूंना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
ड्रोन बंदी आदेशाचं उल्लंघन करण्यावर गुन्हा दाखल होणार
गणेशोत्सवदरम्यान लक्ष्मी रोड येथे ड्रोनद्वारे व्हिडीओ शूटिंग करुन ते सोशल मीडियावर शेअर करण्यात येत असल्याबाबतची माहिती पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्य पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ड्रोन बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात Aircraft Act, Drone Rule, IPC कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ड्रोन वापरण्यावर बंदी
पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत लोकांची प्रचंड गर्दी असते. लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात. ही विसर्जन मिरवणूक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर, यूट्युबर ड्रोनचा वापर करत असतात. परंतु अनेक वेळा ड्रोन वापरण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेतली जात नाही. ही बाब लक्षात घेऊन सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ड्रोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आणखी कशावर बंदी?
यासोबतच गणेशोत्सवाच्या 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरपर्यंत ड्रोन, मायक्रो लाईट्स, हॅण्ड ग्लायडर, पॅरामोटर, हॉट एअर बलूनच्या वापरावर पोलिसांनी बंदी घातली आहे. दहा दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान गणपती मंडळांमध्ये हजारो लोक येतात. या भाविकांच्या सुरक्षेच्या कारणमुळ ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे.
गर्दीवर 1,800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
दरम्यान गणेशोत्सवादरम्यान गर्दीवर 1,800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत. उत्सवादरम्यान दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
हेही वाचा
Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात गणेशोत्सवामुळे पुढील 11 दिवस ड्रोनवर बंदी; पुणे पोलिसांचा आदेश