Pune PMPML : पीएमपीएमएलचे कंडक्टर-प्रवासी एकमेकांत भिडले, बस थेट पोलीस स्टेशनमध्ये, प्रवाशी तासभर ताटकळले!
पुण्यातील पीएमपीएमएल (Pune PMPML) बसचे कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात वादावादी झाल्याचा प्रकार घडला आहे. बसचे कंडक्टर आणि प्रवासी एकमेकांमध्ये भिडले.
Pune PMPML : पुण्यातील पीएमपीएमएल (Pune PMPML) बसचे कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात वाद झाल्याचा प्रकार घडला आहे. बसचे कंडक्टर आणि प्रवासी एकमेकांमध्ये भिडले. या प्रकरणानंतर चालकाने बस थेट पोलीस स्टेशनमध्ये नेली. यामुळं सर्व प्रवाशांना तासभर ताटकळत बसावं लागलं. पिंपरी चिंचवडच्या मोशी भागात ही घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. पास काढण्यावरून हा वाद झाल्याचं कंडक्टर आणि प्रवासी किरण श्रीखंडे यांनी सांगितलं
राजगुरूनगर कडून भोसरीचा निघालेली बस चाकणमध्ये आली. तेव्हा आंबेठाण चौकात किरण नावाचा व्यक्ती बसमध्ये बसला. त्याने मोशीपर्यंतचे पंधरा रुपयांचे तिकीट काढलं. त्यापुढं एक दिवसाचा पन्नास रुपयांचा पास त्याने मागितला. पण यावेळी गैरसमजातून कंडक्टरने पुन्हा मोशीपर्यंतचे तिकीट फाडले आणि यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले. वादाचे रूपांतर एकमेकांवर हात उचलण्यापर्यंत गेले. भांडण मिटत नसल्याचं पाहून चालकाने बस मोशी पोलीस चौकीत नेली. त्याठिकाणी पोलीस उपस्थित नव्हते. नंतर शेवटी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये बस आणली गेली. कंडक्टर आणि किरणने परस्परविरोधी तक्रारी केल्या. पुढील कारवाई पोलिसांकडून सुरू झाली. नंतर बस पुढं मार्गस्थ झाली.
प्रवासी ताटकळले..
प्रवासी आणि कंडक्टरच्या झालेल्या वादावादीत मात्र प्रवाशांना तासभर ताटकळत बसावं लागलं. बस दोन पोलीस स्टेशनमध्ये गेली त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आला. या सगळ्या वेळात प्रवासी खोळंबले. या दरम्यान सगळ्या प्रवासी संतापले होते. त्यांना कामासाठी जाण्यासाठी देखील उशीर झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
पीएमपीएमएलच्या चालकाला माहिलेची मारहाण
मागील आठवड्यातच पीएमपीएमएलच्या चालकाला माहिलेनं मारहाण केली होती. किरकोळ वादातून महिलेने पी एम पी एल बस चालकाला मारहाण केली होती. मारहाण करणारी महिला भाजपची माजी नगरसेविका असल्याचा दावा या बस चालकाने केला होता. स्वारगेट डेपोमध्ये कार्यरत चालक शशांक देशमाने असं मारहाण करण्यात आलेल्या चालकाचं नाव आहे. पुण्यातील अभिनव चौकात दुपारी घटना घडली होती. स्वारगेट डेपोतील पी एम पी एल बसचे चालक शशांक देशमाने ड्युटीवर असताना अभिनव कॉलेज चौकात बस आणि कारचा किरकोळ अपघात झाला होता. त्या अपघातात किरकोळ कारचालक महिला आणि चालक यांच्यामध्ये वाद झाले होते. याच वादातून महिलेने थेट चालकाला बेदम मारहाण केली होती. चालकांच्या मारहाणीच्या प्रकरणात वाढ झाली आहे. त्यामुळे चालकच सुरक्षित नसल्याचं बोललं जात आहे.