(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जंबो कोविड हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध, तरीही रुग्णांना थेट एन्ट्री नाही! आधी 'हे' करा...!
पुणे आणि पिंपरीतल्या जंबो हॉस्पिटलमध्ये थेट दाखल होण्यासाठी आलेल्या कोरोनाबाधितांना माघारी परतावं लागतं आहे. जंबो हॉस्पिटलमधील मोफत सेवेचा लाभ नेमका कसा घ्यायचा असा अनेकांना प्रश्न पडलाय? याचं उत्तर तुम्हाला एका फोन कॉलमध्येच मिळणार आहे.
पुणे : पुणे आणि पिंपरीतल्या जंबो हॉस्पिटलमध्ये थेट दाखल होण्यासाठी आलेल्या कोरोनाबाधितांना माघारी परतावं लागतं आहे. यामुळं पुणे आणि पिंपरी मिळून रोज 50 ते 60 रुग्णांची तारांबळ होतेय. जंबो हॉस्पिटलने देखील हे मान्य केलं आहे. त्यामुळं जंबो हॉस्पिटलमधील मोफत सेवेचा लाभ नेमका कसा घ्यायचा असा अनेकांना प्रश्न पडलाय? आणि याचं उत्तर तुम्हाला एका फोन कॉल मध्येच मिळणार आहे.
देशात सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पुणे आणि पिंपरीतील जंबो हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध असताना ही 50 ते 60 कोरोना बाधित रुग्णांची रोज अशीच तारांबळ होतेय. राज्य सरकारने कोट्यवधी खर्ची घालत उभारलेलं हे जंबो हॉस्पिटल खाजगी संस्थेला चालवायला दिलंय. पण इथं महापालिकेने सुचविलेल्या रुग्णालाच उपचारासाठी दाखल करून घेतलं जातंय. त्यामुळंच इथं उपचारांपेक्षा वादालाच अधिक तोंड द्यावं लागतंय. त्यामुळं जंबो हॉस्पिटलमध्ये रुग्णाला दाखल कसं करायचं असा प्रश्न बहुतांश सामान्यांना पडलाय. यासाठी तुम्हाला फक्त एक फोन करायचा आहे.
या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी काय करावं - पुणे पालिकेच्या ०२०-२५५०२११० या हेल्पलाईनला तुम्हाला संपर्क साधावा लागेल. - इथे तुमची संपूर्ण माहिती घेतली जाते. तुम्ही चाचणी केली का? तुम्हाला कोणती लक्षणं आहेत? - मग जंबो हॉस्पिटलशी संपर्क साधून उपलब्ध बेडचा नंबर तुम्हाला मिळतो - तेंव्हाच तुमचा रुग्ण जंबो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होऊ शकतो
खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एखाद्या कोरोना बाधित रुग्णास जंबो हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचं असेल तर त्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी जंबो हॉस्पिटलच्या डॉक्टरांना रुग्णावर आत्तापर्यंत केलेल्या उपचाराची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक असेल.
जंबो हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार दिले जातात. पण तुमच्या कोरोना बाधित रुग्णांवर इथं दाखल करून, वेळेत उपचार सुरु करायचे असतील तर तुम्हाला महापालिकेच्या या प्रक्रियेतूनच तिथं पोहोचावे लागेल.