(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेनंतर आता टीईटी परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं उघड
TET Paper Leak : जी ए टेक्नॉलॉजी या कंपनीकडे जबाबदारी असलेल्या टी ई टी अर्थात शिक्षक भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झाले आहे.
पुणे : आरोग्य भरतीच्या पेपर परीक्षेपासून सुरु झालेलं पेपर फुटीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाही . कारण म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी .ए . टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख याच्या पिंपरी - चिंचवडमधील घरातून पुणे सायबर पोलिसांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टी ई टी परीक्षेची कागदपत्रं सापडली आहेत. जी ए टेक्नॉलॉजी या कंपनीकडे जबाबदारी असलेल्या टी ई टी अर्थात शिक्षक भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झाले आहे. 21 नोव्हेंबरला ही परीक्षा झाली होती. आरोग्य भरती आणि म्हाडा पाठोपाठ शिक्षक भरतीच्या पेपरमधेही गैरव्यवहार झाल्याचे तपासात आतापर्यंत निष्पन्न झाले आहे.
जी. ए. टेक्नॉलॉजीकडे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वीस पोलीस भरती प्रक्रियेचीही जबाबदारी होती. त्याचबरोबर प्रितेश देशमुख प्रमुख असलेल्या जी . ए .टेक्नॉलॉजी कंपनीकडे महाराष्ट्रातील तब्ब्ल वीस जिल्ह्यांच्या पोलीस भरतीची जबाबदारी देण्यात आली होती . त्यामुळं या कंपनीकडून राबवण्यात आलेल्या सगळ्याच भरती प्रक्रियांबद्दल संशय निर्माण झालंय . पेपर फुटीचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांना एका प्रकरणाचा तपास करता करता आणखी एका परीक्षेचा देखील पेपर फुटल्याचं समजलं. त्या दुसऱ्या प्रकरणाचा तपास सुरु केला की, आणखी एका तिसऱ्या परीक्षेचाही पेपर फुटल्याचं ध्यानात येत आहे . पेपर फुटीचं हे चक्र प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्रावून सोडणारं ठरतंय .
फेब्रुवारी महिन्यात देशभरात राबवण्यात आलेल्या सैन्य भरतीचा पेपर फुटल्यावर त्याचा तपास करणाऱ्या मिल्ट्री इंटेलिजन्सला हा पेपर फोडण्यात सहभागी असलेले आरोपी हे महाराष्ट्रातील आरोग्य भरतीचा पेपर फोडण्यातही सहभागी असल्याचं समजलं.स पुढे आरोग्य भरतीच्या पेपर फुटीचा तपास करणाऱ्या पुणे सायबर पोलिसांना म्हाडाचा पेपरही फुटणार असल्याचं समजलं आणि ही परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जी . ए . टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुखला पोलिसांनी बेड्या ठोकल्या .
आता या प्रितेश देशमुखच्या घरातून पोलिसांना राज्यातील शिक्षक भरतीसाठी राबवण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची कागदपत्रं आणि काही विद्यार्थ्यांची ओळखपत्रं सापडली आहेत. त्यामुळं शिक्षण भरतीची प्रक्रियाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे . त्याचबरोबर प्रितेश देशमुखच्या जी . ए. टेक्नॉलॉजीकडे महाराष्ट्रातील पुणे शहर , पुणे ग्रामीण , औरंगाबाद ग्रामीण , सांगली , सातारा , कोल्हापूर , नवी मुंबई , पिंपरी - चिंचवड , नागपूर , वर्धा , भंडारा , औरंगाबाद शहर , औरंगाबाद कारागृह , सोलापूर आयुक्तालय यासह आणखीही काही परीक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली होती .
या जी . ए . टेक्नॉलॉजी कंपनीकडे या परीक्षांसाठी उमेदवारांना हॉल तिकीट देणे , पेपरची छपाई करणे , परीक्षा घेणे , पेपर जमा करणे , त्यांचं स्कॅनिंग करून त्याद्वारे गुण देऊन निकाल जाहीर करणे अशी सर्व प्रकारची जबाबदारी होती . पण ही कंपनीच गोपनियतेचा भंग करत असल्याचं उघड झालं आहे . त्यामुळं खाजगी कंपन्यांना परीक्षा घेण्याचं कंत्राट देणं किती धोकादायक आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सक्षम करून सर्व परीक्षा या आयोगाच्या मार्फत घेणं हाच सर्वोत्तम उपाय उरतोय.
महाराष्ट्रासह पेपर फुटीचं हे ग्रहण ज्या ज्या राज्यांनी परीक्षा घेण्याची जबाबदारी खाजगी कंपन्यांवर सोपवली त्या उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश , राजस्थान , गुजरात , बिहार या इतर राज्यांनाही लागलंय . मात्र केरळने मात्र खाजगी कंपन्यांना बाजूला सारून केरळा पब्लिक सर्व्हिस कमिशन बोर्ड या स्वतःच्या यंत्रणेमार्फत घेण्याचा शिरस्ता कायम ठेवला आहे. त्यामुळं केरळात पेपरफुटीचे प्रकार घडल्याचं समोर आलेलं नाही . खाजगी कंपन्यांच्या आधी देखील स्थानिक प्रशासनाकडून राबवण्यात येणारी भरती प्रक्रिया अनेकदा वादात सापडली आहे . त्यामुळं राज्य सरकारने सर्व प्रकारच्या परीक्षा घेण्यासाठी आपली स्वतःची सक्षम यंत्रणा उभारणं गरजेचंय. तरच महाराष्ट्रातील लाखो तरुणांचं भविष्य उजाड होण्यापासून वाचवता येणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :