(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : पिंपरीतील शिक्षकाची आयडियाची कल्पना! शिक्षक गणितात तीन वेळा स्वत: नापास झाले अन् विद्यार्थ्यांसाठी 1080 सुत्रांचं गाणंच तयार केलं!
पिंपरी चिंचवडमधील अभिजीत भांडारकर सरांनी तब्बल 1080 गणिती सूत्र संगीताच्या तालावर बसवली आहेत. गणित आणि गीत याची सांगड घालण्यात त्यांना यश आलं आहे.
Pune News : गणिताचा आणि विद्यार्थ्यांचा कायमच छत्तीसचा आकडा असतो. काहीच विद्यार्थ्यांना गणित हा विषय आवडतो मात्र अनेक विद्यार्थी गणित विषय म्हटलं की नाक मुरडतात. त्यातच गणिताची सूत्रे पाठ करणं म्हणजे अनेक विद्यार्थ्यांसाठी कंटाळवाणं काम असतं. मात्र याच गणिताच्या सुत्रांशी गाण्याच्या माध्यमातून पुण्यातील अनेक विद्यार्थ्यांनी दोस्ती केली आहे. पिंपरी चिंचवडमधील अभिजीत भांडारकर सरांनी तब्बल 1080 गणिताची सूत्रे संगीताच्या तालावर बसवली आहेत. गणित आणि गीत याची सांगड घालण्यात त्यांना यश आलं आहे.
अभिजीत भांडारकर सरांच्या या सांगितीक वर्गात विद्यार्थीही आनंदाने त्यांच्याकडून धडे घेत आहेत. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेताना स्वत: भांडारकर सर गणितात तीनवेळा नापास झाले होते. शालेय जीवनात त्यांचा गणिताचा बेस कच्चा राहिल्याने त्यांच्यावर ही वेळ ओढावली होती. अशी वेळ इतरांवर येऊ नये, म्हणून त्याच गणिताला सोप्या पद्धतीनं शिकवण्याचा विडा त्यांनी उचलला. त्यातून संगीताच्या तालावर धडा देण्याची संकल्पना समोर आली. अगदी दोन विद्यार्थ्यांना घेऊन खाजगी तासिका सुरु केलेल्या भांडारकर सरांकडून आज पाचशेहून अधिक विद्यार्थी धडे गिरवत आहेत. गणिताचे धडे देण्याच्या या अनोख्या संकल्पनेची दखल इंडिया, एशिया आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने ही घेतली आहे.
शिक्षकांचीच गणितात गल्लत व्हायची अन्...
अभिजीत भांडारकर या शिक्षकांनी हे गाणं तयार केलं आहे. मात्र त्यांनाही त्यांच्या विद्यार्थीदशेत गणित विषय कधीच आवडला नाही. गणितातील कठीण सूत्र पाठ करणं त्यांच्यासाठी कंटाळवाणं काम असायचं, त्यामुळे त्यांना गणित विषयात कधीही रुची वाटली नाही. त्यामुळे गणितात ते सलग तीन वर्ष नापास झाले. त्यांना इंजिनिअरिंगचा अभ्यास सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांनी आत्मविश्वासदेखील गमावला होता.
अन् गणिताचं गाणंच तयार केलं
प्रत्येक माणूस आईच्या गर्भात असल्यापासून गाणं ऐकत असतो. त्यामुळे गाण्यातून जर एखादी कठीण गोष्ट समजवण्याचा प्रयत्न केला तर तीदेखील अनेकांना सोपी वाटू शकते. हे त्यांनी हेरलं आणि त्यानंतर आपली जशी गणितामुळे गल्लत झाली तशी बाकी विद्यार्थ्यांची होऊ नये यासाठी त्यांनी मुलांच्या आणि तरुणांच्या आवडत्या गाण्यांना एकत्र करुन त्या गाण्याच्या चालीवर अधारित गणितातील सुत्रांचं गाणं तयार केलं आणि 2007 पासून त्यांनी या अनोख्या पद्धतीने गणिताची सूत्र शिकवायला सुरुवात केली.
पहिली ते इंजिनिअरिंगचे सगळी सूत्रे गाण्यात
विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया पक्का नसेल तर भविष्यात कोणतंही शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला तर ते अपयशी ठरु शकतात. हे त्यांनी हेरलं त्यामुळे त्यांनी इयत्ता पहिलीपासून ते इंजिनिअरिंगपर्यंतचे सुमारे 1080 सूत्रे गाण्याच्या चालीवर बसवले आणि यातून आता ते विद्यार्थ्यांमध्ये गणिताची रुची निर्माण करत आहेत. रॅप, वेस्टर्न, भांगडा, जॅझ, साल्सा या सगळ्या प्रकारात त्यांनी सुत्रांची मांडणी केली आहे. आतापर्यंत विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण गणितात प्राप्त केले आहेत.
Pune News : पिंपरीतील शिक्षकाची आयडियाची कल्पना! शिक्षक गणितात तीन वेळा स्वत: नापास झाले अन् विद्यार्थ्यांसाठी सुत्रांचं गाणंच तयार केलं; विद्यार्थ्यांची 1 हजार 80 सूत्र तोंडपाठ...#pune #education @dvkesarkar @ChDadaPatil pic.twitter.com/tkylgLbTOD
— Shivani Pandhare abpmajha (@shivanipandhar1) April 27, 2023