(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune school Bus News : चालक अन् केअर टेकरचा हलगर्जीपणा, चार वर्षाची चिमुकली स्कूल बसमध्ये झोपली अन्...;नेमकं काय घडलं?
स्कूल बसच्या चालक आणि महिला केअर टेकर यांच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षाची मुलगी सुमारे तीन तास बंद बसमध्येच अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Pune school Bus News : स्कूल बसच्या चालक आणि महिला केअर टेकर (Pune school Bus News) यांच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षाची मुलगी सुमारे तीन तास बंद बसमध्येच अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कल्याणी नगर येथील बिशप को-एड स्कूलमधील एका विद्यार्थीनीसोबत हा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे पालकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
चार वर्षाच्या मुलीला तिच्या आजीने शाळेत सोडणाऱ्या बसमध्ये बसवून दिलं होतं. त्यानंतर ती बस मुलीला घेऊन शाळेत गेली. मात्र या प्रवासादरम्यान या मुलीला झोप लागली. शाळेत पोहचल्यावर बसमधून बाकी विद्यार्थी उतरले मात्र ही मुलगी झोपली असल्याने शाळेत पोहचल्यावर उतरली नाही. काही वेळाने तिला जाग आल्यावर तिने आरडाओरड सुरु केली. मात्र शाळेजवळील निर्जन भागात बस उभी असल्याने तिचे रडणे कुणापर्यंत पोहोचले नाही. सुदैवाने शाळेत आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या एका पालकाने मुलीला बसमध्ये अडकलेले पाहिले. तत्काळ शाळा व्यवस्थापनाला कळवले आणि दुपारी दोनच्या सुमारास मुलीला बाहेर काढण्यात आले. सुमारे तीन तास बसमध्ये अडकली होती.
चालकांचा निष्काळजीपणा...
चालक आणि महिला महिला केअर टेकर यांच्याकडून पूर्ण निष्काळजीपणाची ही घटना घडली. पालकांनी या घटनेची चौकशी केली असता शाळेच्या अधिकाऱ्यांनीही योग्य उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. शाळा व्यवस्थापन आणि बस सेवा चालकाचे हे निष्काळजीपणा आहे. आमची मूलगी शाळेच्या बसमध्ये मदतीसाठी ओरडत होते हे कळल्यावर आम्हाला धक्का बसला. ते सुरक्षीत हातात असतील या विश्वासाने आम्ही आमच्या मुलांना शाळेच्या स्वाधीन करतो. पण या घटनेनंतर, मला माझ्या मुलाला एकटे सोडण्याची भीती वाटते, असं चार वर्षांच्या मुलीचे वडिल तरनदिप सिंह यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. या घटनेबाबत येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून शाळा व्यवस्थापन आणि बसचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
लहान मुलांच्या सुरक्षीततेचा मुद्दा ऐरणीवर
या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षीततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यात हजारो विद्यार्थी या प्रकराच्या बसने शाळेत येजा करतात. रोज या बसच्या संदर्भात अनेक तक्रारीदेखील पालक करत असतात. मात्र अशा प्रकारची घटना घडल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुलांसंदर्भात अशा प्रकारे हलगर्जीपणा होत असेल आणि या चालकांच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवाने अघटीक काही घडलं असतं तर याची जबाबदारी कोणी घेतली असती, असा प्रश्न सध्या पालकांकडून विचारला जात आहे.
हेही वाचा-