(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : पुण्यातील भाटघर धरणात वडील-मुलगी बुडाले; मुलीचा मृत्यू, वडिलांचा शोध सुरु
Pune News : पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापैकी मुलीचा मृत्यू झाला असून वडील अद्याप बेपत्ता आहेत.
पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील भाटघर धरणात (Bhatghar Dam) बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापैकी मुलीचा मृत्यू झाला असून वडील अद्याप बेपत्ता आहेत. ऐश्वर्या धर्माधिकारी (वय 13 वर्षे) असं मृत मुलीचं नाव आहे. तर शिरीष धर्माधिकारी (वय 45 वर्ष) यांचा शोध सुरु आहे. हे बाप-लेक पुण्यातील बालवाडीतील रहिवासी होते
नेमकं काय घडलं?
सलग सुट्ट्या असल्याने बालेवाडीत राहणारे फालक आणि धर्माधिकारी कुटुंब 15 ऑगस्ट रोजी भोर तालुक्यातील जयतपाड गावातील मुंगळे रिसॉर्ट या ठिकाणी गेले होते. काल दुपारी चारच्या सुमारास सर्व जण सीमा फार्म हाऊच्या मागे असणाऱ्या भाटघर धरणाचे बॅक वॉटर पाहायल गेले. त्यावेळी शिरीष धर्माधिकारी हे बेबी पूल पाहण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांनी मुलगी ऐश्वर्यालाही बोलावून घेतलं. शिरीष धर्माधिकारी आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या हे भाटघर धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र खोल पाण्यात पोहत असताना दोघेही बुडाले.
मुलीला पाण्यातून बाहेर काढलं पण...
यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु केलं. त्यांनी ऐश्वर्याला बाहेर काढलं. तिला भोरमधील सरकारी रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तर शिरीष धर्माधिकारी यांचा शोध अद्याप लागलेला नाही.
मुळशीमध्ये आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू
दुसरीकडे कालच (15 ऑगस्ट) मित्रांसोबत फिरायला गेलेल्या आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास मुळशीतील रिहे गावच्या हद्दीत घडली. हर्षित पोटलुरी (वय 27 वर्षे) असं मृत्यू पडलेल्या आयटी अभियंत्याचं नाव आहे. स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्याने हर्षित आपल्या दोन मित्रांसोबत हिरे बंधारा परिसरात फिरण्यासाठी गेला होता. बंधाऱ्यात पोहायला उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो बंधाऱ्याच्या पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे.
सख्ख्या भाऊ आणि बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू
5 ऑगस्ट रोजी पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील गंगापूर गाडेकरवाडी इथे सख्ख्या दोन भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दिगु अरुण काळे (वय 11 वर्षे) आणि अंजली अरुण काळे (वय 14 वर्ष) हे भाऊ बहिण दोघे खेकडे पकडण्यासाठी गेले होते. वरसुबाई देवस्थान गाडेकरवाडी या ठिकाणी असलेल्या ओढ्यावर खेकडे पकडण्यासाठी जात असल्याचं त्यांनी घरी सांगितलं. परंतु बराच वेळ झाल्यानंतर ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी ओढ्याजवळ त्यांचा मृतदेह सापडला. दोघे खेकडे पकडताना पाण्यात पडले अन् त्यांचा मृत्यू झाल्याचे यावेळी स्पष्ट झालं.
हेही वाचा
Pune : एकाच घरातील पाच तरुणींचा भाटघर धरणात, तर चार शाळकरी मुलांचा चासकमान धरणात बुडून मृत्यू