Pune Chandani Chowk Traffic : चांदणी चौक पुलाच्या पाडकामानंतर आजपासून वाहतुकीसाठी दोन लेन सुरु; वाहन चालकांना दिलासा
Pune News: चांदणी चौकातून प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर आजपासून दोन लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीपासून पुणेकरांची काही प्रमाणात सुटका झाली आहे.
Chandani Chowk Traffic : पुण्यातील (Pune) चांदणी चौकातून (chandani chowk) प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर आजपासून दोन लेन वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीपासून (traffic) पुणेकरांची काही प्रमाणात सुटका झाली आहे. 1 ऑक्टोबरला रात्री 1 वाजता हा पूल पाडण्यात आला होता. या मार्गावरील मातीचा ढिगारा, डेब्रिज हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु होतं. त्यानंतर या पूलाजवळील दोन टेकड्या हटवण्यासाठीदेखील दोन लहान ब्लास्ट करण्यात आले होते. आता ढिगारा हटवण्याचे हे काम पूर्ण झालं असून या मार्गावरील दोन लेन वाहतुकीसाठी सुरळीत सुरु करण्यात आल्या आहेत.
टेकड्यांवर ब्लास्ट करुनही मोठं आव्हान
चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर शेजारी दोन्ही बाजूला असलेल्या टेकड्या हटवण्यासाठी टप्प्याटप्याने दोन लहान ब्लास्ट करण्यात आले होते. त्यानंतर दोन लेन वाहतुकीसाठी सुरू करण्याचं मोठं आव्हान होतं. या टेकड्यांमुळे रस्ता अरुंद होत होता. त्यामुळे टेकड्या हटवण्यात आल्या. टेकडीच्या काळ्या पाषाणामुळे हे पोकलेन लावूनही हे काम कठीण होतं. मात्र सगळ्या यंत्रणाच्या मदतीने हे काम पूर्ण करण्यात आलं आहे.
मुंबई-बंगळुरू हा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी आहे. मात्र चांदणी चौकात हा महामार्ग दोन पदरी होत होता. जुन्या पूलामुळे या ठिकाणी बॉटल नेक तयार होत होता. त्यामुळे या चौकात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी व्हायची. मात्र पूल पाडल्यानंतर दोन लेन तयार झाल्या आहेत. टेकडी आणि पूल या दोन्हीची जागा आता महामार्गाने घेतली आहे.
नव्या प्रकल्पाला 2024 उजाडणार
चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर त्या ठिकाणी नवा मार्ग उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यासाठी अजून दोन वर्षांची वाट बघावी लागणार आहे. पुणेकरांना नवीन मार्गाचा लाभ घेण्यासाठी 2024 उजाडणार आहे. मात्र, त्याआधी चांदणी चौकातील वाहतूक कोंडीतून पुणेकरांची काही प्रमाणात सुटका झाली आहे.
वाहतूक सुरळीत झाल्याने विद्यापीठाच्या पूलाचं काम लवकरच सुरु होणार
चांदणी चौकातील दोन सर्व्हिस लेनमुळे वाहतूक सुरळीत होत असल्याने पुणे विद्यापीठाच्या पूलाच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुणे विद्यापीठ जंक्शनवरील बहुस्तरीय उड्डाणपुलाचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन केले आहे. या रस्त्याला पूर्ण होण्यासाठी 3 वर्षांची वाट बघावी लागणार आहे.
संबंधित बातम्या-
Pune Chandani Chowk : आज रात्री या वेळेत चांदणी चौकात असेल ब्लॉक; वाहतूक वाकडमार्गे वळवण्यात येणार