Pune New Year Celebration : पार्टी ऑल नाईट! नाताळ अन् थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात मद्यविक्री रात्री एकपर्यंत; तर जल्लोष पहाटे पाचपर्यंत; जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी
Pune New Year Celebration : कायद्याचे भान ठेवून नवीन वर्षाचे स्वागत करावे. ज्या ठिकाणी मद्य प्राशन करण्याची परवानगी नाही, अशा ठिकाणी जाऊन मद्य प्राशन करू नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
पुणे: पुणेकरांना नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यप्रेमींना रात्री उशिरापर्यंत पार्टी करता येणार आहे. पुणे शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यप्रेमींना रात्री एकपर्यंत मद्य खरेदी करता येणार आहे, तर पहाटे पाचपर्यंत पार्टी करता येणार आहे. रात्रभर पार्टी करण्यासाठी हॉटेल सुरू राहणार आहेत. पहाटे पाचपर्यंत रेस्टॉरंट, बार सुरू ठेवण्यास पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र, मद्यविक्री करण्यासाठी रात्री एक वाजेपर्यंतचे बंधन घालण्यात आलं आहे.
नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागतासाठी पुणे शहरात पहाटे पाचपर्यंत पार्टी करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. त्यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यासाठी आदेश दिला आहे. त्यामध्ये नाताळनिमित्त होणाऱ्या पार्टीसाठी पहाटे पाचपर्यंत परवानगी दिली आहे. बुधवारी (ता. 25) आणि मंगळवारी (ता. 31) या दोन दिवशी ही परवानगी देण्यात आली आहे. नाताळनिमित्त शहरामध्ये विविध ठिकाणी पार्टी आयोजित केली जाते. त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे 50 अर्ज आले होते, त्यांना परवानगी दिली आहे. ही परवानगी केवळ एक दिवसासाठीच असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुण्यात मद्यविक्रीची जवळपास तीन हजार दुकाने आहेत. सरकारने परवानगी दिली असली तरी करण्याचा प्रयत्न करू नये. कायद्याचे भान ठेवून नवीन वर्षाचे स्वागत करावे. ज्या ठिकाणी मद्य प्राशन करण्याची परवानगी नाही, अशा ठिकाणी जाऊन मद्य प्राशन करू नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यासह मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट व क्लब यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नाताळाच्या दिवशी आणि 31 तारखेच्या रात्री पहाटे पर्यंत सेलिब्रेशन करता येणार आहे. शहरात सर्वत्र मोठा उत्साह दिसून येत आहे. नाताळाच्या दिवशी आणि 31 तारखेला राज्यातील खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रूम व ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. हॉटेल आणि बार सुरू ठेवण्यासाठी इंडियन हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी यांनी राज्य शासनाकडे या संदर्भातील विनंती केली होती. त्यानुसार राज्य शासनाने नाताळ व नववर्षाच्या दिवशी हॉटेल पहाटे पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
या नियमांचं करावं लागणार पालन
हॉटेल चालकांना परवानगी देण्यात आली असली तरी देखील काही नियमांचे पालन हॉटेल व्यावसायिकांना करावे लागणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानिक प्रशासनाकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त शहरात तैनात केला जाणार आहे. त्याचबरोबर, प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे. मद्यपान करून वाहन चालवल्यास कारवाई देखील केली जाणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.