Pune New Year Celebration : तब्बल 700 रुपये किलो मटण, तरीही पुणेकर म्हणतात 'होऊ दे पार्टी'
Pune New Year Celebration : विशेष म्हणजे मटण (Mutton) आणि चिकन (Chicken) घेण्यासाठी सकाळपासूनच दुकानाबाहेर गर्दी पाहायला मिळत आहे.
Pune New Year Celebration : पुणेकरांची (Pune) ओळख खवय्ये म्हणून जगप्रसिद्ध आहे. त्यातच 31 डिसेंबरला आलेला रविवार म्हणजे पुणेकरांसाठी जणू एक पर्वणीच ठरत आहे. त्यामुळे 2023 चा निरोप घेतांना आणि 2024 या नवीन वर्षांचे स्वागत (New Year Celebration) करण्यासाठी पुणेकरांनी जोरदार तयारी केली आहे. विशेष म्हणजे मटण (Mutton) आणि चिकन (Chicken) घेण्यासाठी सकाळपासूनच दुकानाबाहेर गर्दी पाहायला मिळत आहे. तब्बल 700 रुपय किलो मटण मिळत असतांना देखील पुणेकर 'होऊ दे पार्टी'च्या मूडमध्ये पाहायला मिळत आहे.
2024 च्या स्वागतासाठी आज पुण्यातील अनेक मटण-चिकन दुकानांच्या बाहेर मोठ्या रांगा पाहायला मिळतायत. कोणी मित्रांसोबत, तर कोणी कुटुंबीयांसोबत आजचं सेलिब्रेशन करणार आहे. त्यामुळे चिकन, मासे आणि मटण खाण्यासाठी बेत आखला जातोय. मटणाचे भाव 700 रुपये किलोच्या वर जरी गेले असले, तरी सुद्धा आजच्या पार्टीला कुठली ही कमी राहू नये म्हणूनच आज सकाळपासून नागरिकांनी या दुकानांच्या बाहेर गर्दी केली होती. त्यामुळे पुणेकरांचा आजचा प्लॅन जबरदस्त असणार यात कोणतेही शंका नाही.
वाहतुकीत बदल...
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी होत असल्यामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपासून पुण्यातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. ज्यात, पुण्यातील एमजीरोड, एफसी रोड, जेएम रोड संध्याकाळी पाच नंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या तीनही मुख्य रस्त्यांवर मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांना कुठलाही मनस्ताप होऊ नये यासाठी वाहतूक शाखेने हा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील बंद असणारे मार्ग...
- एमजीरोड: महात्मा गांधी रस्त्यावरील 15 ऑगस्ट चौक ते अरोरा टावर्स चौक दरम्यान वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.
- एफसीरोड: फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना नो एंट्री असणार आहे.
- जेएम रोड: जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद असणार आहे.
नववर्षाच्या स्वागताला पुणेकर सज्ज
पुण्यात आज सर्वत्र नवीन वर्षाचे जल्लोषी वातावरण पाहायला मिळत आहे. हॉटेल्स, पबमध्ये विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत लाइव्ह म्युझिक बॅण्ड अन् डीजेच्या तालावर थिरकत नवीन वर्षाचे स्वागत होणार आहे. मुळशी, लोणावळा, सिंहगड परिसर, पानशेत, भोर या शहरालगतच्या हॉटेल, रिसॉर्ट, बंगले, लॉजिंगचे बुकिंग झाले आहे. येथे विविध थीमनुसार न्यू इअर पार्टी आयोजित केली असून, सर्वच ठिकाणी लाइव्ह म्युझिक बँड, डीजे नाइटसह, विविध खाद्यपदार्थांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील चौका-चौकात पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: