(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा धावणार पुणे लोकल! फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश
लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा पुणे लोकल धावणार आहे. मात्र, लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
पुणे : मध्य रेल्वे आता पुणे लोकल देखील सुरू करणार आहे. आजच पुणे लोकल सुरू करणार असल्याचे मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रक काढून सांगितले आहे. येत्या 12 तारखेपासून पुणे लोकल धावणार आहे. मात्र, ही लोकल केवळ अत्यावश्यक सेवेतील सरकारी कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.
मुंबईमध्ये 15 जूनपासून लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्यात आली होती. त्याच धर्तीवर पुण्यात देखील लोकल सुरू करण्यात येत आहे. राज्य सरकारने अनलॉक 5 च्या गाईडलाईन्स मध्ये पुणे लोकल सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मध्य रेल्वे वेळापत्रक बनवून पुणे ते लोणावळा या स्थानकांच्या दरम्यान लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 ऑक्टोबर पासून दिवसाला चार लोकलच्या फेऱ्या या चालविल्या जाणार आहेत. त्यात सकाळच्या वेळेत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी एक लोकल तर संध्याकाळी अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी एक लोकल चालवली जाईल असे मध्य रेल्वेने सांगितले आहे.
या स्पेशल लोकल्सचे वेळापत्रक असे असेल, सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी पुण्यावरून लोणावळासाठी पहिली लोकल रवाना होईल. ती साडेनऊ वाजता लोणावळा स्थानकात पोहोचेल. तर लोणावळा स्थानकातून 8 वाजून 20 मिनिटांनी एक लोकल पुण्यासाठी रवाना होईल. ती 9 वाजून 45 मिनिटांनी पुणे स्थानकात पोहोचेल. तर संध्याकाळच्या वेळेत पुणे स्थानकातून 6 वाजून 2 मिनिटांनी लोणावळ्या साठी लोकल सुटेल ती संध्याकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी लोणावळ्याला पोहोचेल. तर संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी लोणावळा स्थानकातून पुण्यासाठी लोकल सुटेल, जी 7 वाजता पुणे स्थानकात पोहोचेल.
या लोकलचा वापर केवळ राज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी करू शकतात. तसेच खासगी क्षेत्रातील आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील या लोकांनी प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना आपले आयकार्ड दाखवून प्रवेश देण्यात येईल. तसेच त्यांना क्यूआर कोड देखील काढावा लागेल. हे कर्मचारी वगळता इतर कोणालाही या लोकलने प्रवास करण्याची मुभा असेल असे मध्य रेल्वेने सांगितले आहे.
Aaditya Thackeray | ऑक्टोंबरमध्ये सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार : आदित्य ठाकरे