Pune Bypoll election : रविंद्र धंगेकरांच्या हालचालींवर भाजपची नजर?; प्रचारासाठी काहीच तास बाकी असताना भाजपकडून 'या' तीन नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी
कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपसमोर तगडं आव्हान केलं आहे. त्यामुळे कसब्याची जबाबदारी गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.
Pune Bypoll election : पुण्यात कसबा आणि चिंचवड (Pune Bypoll Election) या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सुरु आहे. दोन्ही मतदारसंघात भाजपकडून आणि महाविकास आघाडीकडून जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्यात कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याच्या नेत्याचं लक्ष लागलं आहे. कसब्याची निवडणूक ही दोन्ही पक्षासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात भाजपकडून चांगलीच तयारी सुरु आहे. प्रचारासाठी फक्त काही तास बाकी आहेत. त्यामुळे भाजपने भाजपच्या तीन मुख्य़ नेत्यांकडे कसब्याची शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याकडून धंगेकरांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
चिंचवडमध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या उमेदवारीचा फटका हा महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपसमोर तगडं आव्हान उभं केल्यानं भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कसबा मतदारसंघाची जबाबदारी गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर या भाजपच्या प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. पुढील काही दिवस पक्षाची आणि वैयक्तिक सगळी कामं बाजूला ठेवून त्यांनी कसबा मतदार संघाकडे लक्ष देण्याचे आदेश या तीन नेत्यांना दिले आहेत.
धंगेकरांच्या हालचालींवर भाजपची नजर?
कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत, अशी चर्चा मतदार संघात सुरु आहे. त्यामुळे धंगेकरांच्या प्रत्येक हालचालीवर भाजपच्या कार्यकर्ते आणि नेते मंडळींकडून बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. धंगेकर मागील 25 वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळे कसब्य़ातील काही भाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागामध्ये रविंद्र धंगेकरांची चांगली पकड आहे. शिवाय त्यांची सामान्यांचे नेते म्हणून ओळख आहे. त्यामुळे कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी जोरदार लढत बघायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रचारासाठी काहीच तास बाकी असताना भाजपकडून जोमात प्रचार सुरु आहे. शिवाय धंगेकरांच्या बारीक हालचालींवर भाजपकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.
भाजपकडून सभा रद्द अन् कॉंग्रेसचा रोड शो
कसब्यासाठी भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली आणि रोड शो आयोजित करण्यात आला. त्यासोबतच महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकरांसाठी आदित्य ठाकरेंचा रोड शो जल्लोषात होणार आहे.