Pune Hinjwadi Bus Fire: हिंजवडी जळीतकांडात नवी अपडेट! 5 लीटरपैकी 4 लीटर बेंंझीन केमीकल कुठे? जनार्दन हंबर्डीकरचं सीसीटीव्ही फुटेज समोर
Pune Hinjwadi Bus Fire: तीन कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून देण्यात आल्याचं हे कृत्य चालकाने केल्याचं तपासात उघड झालं आहे. मात्र ज्यांना जीवे मारायचं होते, ते यातून बचावले आणि निष्पाप चौघांचा यात बळी गेला आहे.

पुणे: पुण्यातील हिंजवडीत (Pune Hinjwadi Bus Fire) टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणात झालेल्या खुलासा सर्वांनाच मोठा धक्का देणारा आहे. टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर चालकाने काही गोष्टीमुळे आलेल्या रागातून गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळं चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी आणि जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून देण्यात आल्याचं हे कृत्य चालकाने केल्याचं तपासात उघड झालं आहे. मात्र ज्यांना जीवे मारायचं होते, ते यातून बचावले आणि निष्पाप चौघांचा यात बळी गेला आहे. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणात एबीपी माझाने दिलेल्या एका बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे.
टेम्पो ट्रॅव्हल्स चालक जनार्दन हंबर्डीकरने एक लिटर बेंझिन केमिकलचा वापर करुन टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून दिली. मात्र, प्रत्यक्षात व्युमा ग्राफिक्स कंपनीतून त्याने पाच लिटर बेंझिन केमिकल आणल्याचं कंपनीच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहे. हिंजवडी पोलिसांनी कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात ही घेतले आहे. जनार्दन हंबर्डीकरने कंपनीतून पाच लिटर बेंझिन आणलं होते, या 'एबीपी माझा'च्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. चालक हंबर्डीकरने जर एक लिटर बेंझिन केमिकल टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवण्यासाठी वापरलं असेल, तर मग हंबर्डीकरने उरलेलं चार लिटर बेंझिन केमिकल कुठं ठेवलंय? आणि त्याचा वापर नेमका कशासाठी करणार होता? याचा छडा आता पोलिसांना लावायचा आहे.
तर त्या चौघांचा जीव वाचला असता...
तसेच टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये ही इमर्जन्सी एक्झिटजवळ अडथळा आणल्याचं समोर आलं आहे. गाडीची निर्मिती करताना तीन सीट्स असताना, तिथं चार सीट्स कशा काय होत्या? हा बदल नेमका कोणी आणि कशासाठी केला? ही चौथी सीट नसती तर कदाचित इमर्जन्सी एक्झिट डोअर उघडता आलं असतं आणि चार कर्मचाऱ्यांचा जीव ही वाचला असता.
बेंझिन किती ज्वलनशील आहे, याची कल्पना व्युमा ग्राफिक्स कंपनीला नक्कीच आहे. तरी त्यांनी हा निष्काळजीपणा केल्याचं आता सिद्ध होत आहे. तसेच टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये इमर्जन्सी एक्झिटला अडथळा ठरणाऱ्या चौथ्या सीट्सकडे व्युमा ग्राफिक्स कंपनी दुर्लक्ष केल्याचं ही स्पष्ट झाले आहे. कंपनीच्या या दोन चुकांमध्ये चार कर्मचाऱ्यांना नाहक जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं हिंजवडी पोलीस व्युमा ग्राफिक्स कंपनीतील आणखी कोणाला याबाबत दोषी धरलं जाणार? आणि कोणावर गुन्हा दाखल केला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
टेम्पो ट्रॅव्हल्स जाळण्याचे कारण काय?
दिवाळी बोनससह पगार थकवला आणि चालक असून मजुरांची कामे सांगितली जात होती. त्यामुळे टेम्पो चालक जनार्दन हंबर्डीकरने हा कट रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं बिंग फुटलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याने या घटनेवर हळहळ व्यक्त करणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, हे सर्व कर्मचारी सकाळच्या शिफ्टला ऑफिसला चालले होते.
ते शेवटपर्यंत झगडले
गाडीच्या जळालेल्या लोखंडावर ओरखडे होते. ते शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. कोणीतरी त्या बंद दरवाज्याला ओरबाडून उघडायचा प्रयत्न केला होता. जीवाच्या अकांताने ते दार उघडण्याचा प्रयत्न करत असतील. पण तो दरवाजा उघडला नाही. फुटलेल्या काचांवरही असेच निशाण होते. ते शेवटपर्यंत झगडले होते. या घटनेनंतर त्या जळालेल्या बसच्या कोपऱ्यामध्ये जेवणाचे डबे, जळालेल्या चपला दिसत होत्या. या बसमधील जळालेल्या सीटचा कोळसा झाला आहे. गाडीच्या आतील धातू देखील वितळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

