Pune Ganeshotsav 2023 : पुढच्या वर्षी लवकर या! शेकडो ढोल वादक, रांगोळ्यांच्या पायघड्या, बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज
Pune Ganeshotsav 2023 : भक्तांकडील 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पा आज परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. बाप्पाला निरोप देण्यासाठी आता पुणेकर सज्ज झाले आहेत.
पुणे : भक्तांकडील 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर (Pune Ganeshotsav 2023) गणपती बाप्पा आज परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. बाप्पाला निरोप देण्यासाठी आता पुणेकरांसह महापालिका, पोलिस वाहतूक शाखा यासह सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. पुण्यातील मध्यवर्ती भागात आज तरुणांचा जल्लोष बघायला मिळणार आहे. विसर्जनाच्या तयारीसाठी पुणे शहरातील महत्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेच. तर विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. अनंत चतुर्शदशीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर सज्ज झालं आहे. शेकडो ढोल ताशा पथक, हजारो सार्वजनिक गणेशमंडळं आणि मानाच्या गणपतीची एक झलक पाहण्यासाठी पुणेकर गर्दी करणार आहेत.
पहाटेपासूनच गणेश मंडळांनी विसर्जनाची तयारी करायला सुरुवात केली आहे. टप्याटप्यात मानाच्या गणपती मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. सकाळी 9 वाजचा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील या मिरवणुकींमध्ये सहभागी होणार आहे. त्यानंतर अनेक नेते मंडळी मिरणुकीत सहभागी होणार आहेत.
ढोल ताशा पथकं सज्ज...
मागील तीन महिन्यांपासून ढोल ताशा पथकांचा सराव सुरु होता. हे शेकडो वादक विसर्जन मिरवणुकीच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते. त्यामुळे शेकडो वादक पुण्याच्या मध्यवर्ती भागात वादनासाठी एकत्र जमायला सुरुवात झाली आहे. बेलबाग चौकात, लक्ष्मी रस्त्यावर आणि प्रत्येक मानाच्या आणि महत्वाच्या गणपतीसमोर ढोल ताशा पथकं वादनासाठी सज्ज होत आहेत.
दगडूशेठ गणपतीच्या मिरणवुकीसाठीदेखील सध्या जोरदार तयारी सुरु आहे. पुण्यातील मंडई परिसरात, बेलबाग चौकात आणि लक्ष्मी रस्त्यांवर मोठ-मोठ्या रांगोळ्या काढण्यात येत आहे. पुण्यातूनच नाही वेगवेगळ्या गावातून रांगोळी कलाकार पुण्यात आले आहेत. बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत.
4 वाजता दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला होणार सुरुवात
पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत कोणता गणपती कधी सहभागी होणार यावरुन वाद बघायला मिळाला. मात्र, दगडूशेठ गणपती मंडळ चार वाजता मिरवणुकीत सहभागी होण्यावर ठाम आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला थाटात निघणार आहे. यंदा श्री गणाधीश रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत आहे.
इतर महत्वाची बातमी-