Pune Crime News : पुणे हादरलं! बसमध्ये ओळख, धमक्या अन् लॉजवर नेत केला वारंवार लैंगिक अत्याचार
अल्पवयीन मुलीला मारण्याची आणि तिचं कॉलेज बंद करण्याची वारंवार धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी एका 21वर्षीय नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Pune Crime News : पुण्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यातच खून, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यात सातत्याने वाढच होताना दिसत आहे. अशीच एक संतापजनक आणि धक्कादायक घटना मार्केटयार्ड परिसरात घडली आहे. अल्पवयीन मुलीला मारण्याची आणि तिचं कॉलेज बंद करण्याची वारंवार धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी एका 21वर्षीय नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी अल्पवयीन मुलीने मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिजीत दिलीप पापळ (वय 21, रा. अप्पर इंदिरानगर, पुणे) या नराधमाला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी ही मार्केटयार्ड परिसरात राहते. ती एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेते. कॉलेजला जाण्यासाठी ती pmpml बसचा वापर करत होती. याच प्रवासादरम्यान दोघांची ओळख झाली होती. याच ओळखीचा आरोपीने गैरफायदा घेतला आणि तिला धमकी द्यायला सुरुवात केली. तिच्यावर वारंवार बलात्कार केला. डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023दरम्यान हा सगळा प्रकार घडला आहे.
लॉजवर नेऊन ठेवले संबंध
भूगाव येथील एका लॉजवर घेऊन जात अभिजीत पापळ याने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर याविषयी कुठे वाच्यता केल्यास किंवा कोणाला काहीही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देखील दिली. या सगळ्या प्रकारामुळे मुलगी ही पोलिसांत तक्रार देण्यास घाबरत होती.अखेर हिम्मत करून तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस पुढील तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात वाढ...
पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे. एकाच दिवसात अशी दुसरी घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमामधील सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्यात संतापजनक बाब म्हणजे मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पिडीत विद्यार्थिनीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात युवकावर बाल लैंगिक अत्याचारसह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.