Pune Crime News: 'मित्रांनो, हा माझ्या...', घरी मला मेन्टली खूप त्रास दिला जातोय, तरूणाने हिंजवडीमध्ये इमारतीवरून घेतली उडी; इन्स्टाग्रामवरती शेअर केलं कारण अन्...
Pune Crime News: हे टोकाचं पाऊल उचलण्याआधी त्याने हा निर्णय का घेतला याबाबत व्हिडिओ बनवून तो आपल्या सोशल मिडियावरती शेअर केला आहे.

पुणे: पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका तरूणाने सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटने समोर आली आहे. हे टोकाचं पाऊल उचलण्याआधी त्याने हा निर्णय का घेतला याबाबत व्हिडिओ बनवून तो आपल्या सोशल मिडियावरती शेअर केला आहे, त्याने आपल्या मावस भावांच्या बोलण्याला आणि त्रासाला कंटाळून आपण जीवन संपवत असल्याचं त्याने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
'मित्रांनो, हा माझ्या आत्महत्येचा व्हिडीओ आहे. व्हायरल करा', अशा मेसेजसह या तरूणाने आपला व्हिडीओ इन्स्टाग्रामवरती अपलोड करून तरुणाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या त्याच्या दोघा मावसभावांना पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडी फेज- 2 येथे 12 फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास घडलेली ही घटना दोन महिन्यांनंतर पोलिस तपासात उघडकीस आली आहे.
तेजस बाजीराव सोनागरे (वय वर्षे 20, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक किशन हरिभाऊ कांदे यांनी शुक्रवारी (दि. 4 एप्रिल) फिर्याद दिली आहे. तर या प्रकरणात नीलेश ऊर्फ गोलू संजय पुंडे (25 आणि मंगेश संजय पुंडे (23, दोघेही रा. तळवडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मृत तेजस हा हिंजवडीतील खासगी कंपनीमध्ये नोकरीला होता. संशयितांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून तेजसने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये आत्महत्येस नीलेश पुंडे आणि मंगेश पुंडे जबाबदार असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी त्यांना अटक केली. तेजसच्या आई-वडिलांचे निधन झाले असून, त्याचा सांभाळ त्याच्या मामानेच केला आहे. तेजस एकलकोंडा स्वभावाचा होता.
तेजसने शेअर केलेल्या व्हिडीओत काय आहे?
तेजसने आत्महत्या करण्यापूर्वी इन्स्टाग्रामवरती एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं आहे की, 'हा व्हिडीओ पाहणाऱ्यांनो, तो जेवढा व्हायरल होईल, तेवढा व्हायरल करा. धिस इज माय सुसाइड व्हिडीओ. याचे एकमेव कारण म्हणजे घरी मला मेन्टली खूप त्रास दिला जात आहे. मी कामाला येतोय, मी माझी सॅलरी कमावतोय, ऑब्हीअसली मी जे सेव्हिंग करतोय, ते माझ्या स्वतःसाठी करतोय. माझ्याकडे किती पैसे आहेत, किती उरले, हे विचारायचा काय हक्क आहे कोणाला? याला सगळ्यात मुख्य कारणीभूत आहेत, ते माझे दोन मावसभाऊ नीलेश पुंडे आणि मंगेश पुंडे. व्हिडीओ जेवढा व्हायरल करता येईल तेवढा प्लीज करा', असा व्हिडीओ तेजस यांनी इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. या व्हिडिओनंतर आता या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.























