(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : एकीकडे आरोपी पडकल्यास बक्षिसं जाहीर तर दुसरीकडे मोक्का लावलेला आरोपी पसार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
मोक्का कारवाई करण्यात आलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. संतोष बाळु पवार असं या आरोपीचं नाव आहे.
Pune Crime News : : एकीकडे आरोपी पकडल्यास पोलिसांना बक्षिसं जाहीर करण्यात आले आहे तर दुसरीकडे मोक्का कारवाई करण्यात (pune Crime) आलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. संतोष बाळू पवार असं या आरोपीचं नाव आहे. मार्केटयार्डमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून 28 लाख रुपये लुटून नेणार्या टोळीवर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी नुकतीच मोक्काची कारवाई केली होती. याच टोळीतील हा आरोपी होता.
मार्केटयार्ड परिसरात दिवसाढवळ्या पिस्तुलाचा धाक दाखवून 28 लाख रुपयांचा दरोडा अविनाश रामप्रताप गुप्ता आणि त्याच्या टोळीने टाकला होता. 12 नोव्हेबर रोजी अंगडियाच्या कार्यालयात जाऊन त्यांनी हा दरोडा टाकला होता. पोलिसांनी या टोळीला पकडले होते. त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला होता. यात अविनाश रामप्रताप गुप्ता (20, वैदगौरव सोसायटी, शिंदे पुल, शिवणे,पुणे), अदित्य अशोक मारणे (28, रा. कामगार विकास सोसायटी, दत्तनगर, वारजे माळवाडी,पुणे), अजय बापू दिवटे (23, रा. रामनगर, वारजे पुणे), निलेश बाळू गोठे (20, रा. मंगळवारपेठ, पुणे), विशाल सतिश कसबे (20, रा. मंगळवार पेठ,पुणे), दिपक ओमप्रकाश शर्मा (19, रा. राहुलनगर, शिवणे,पुणे), गुरूजन सिंह सेवासिंग विरग (22, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर), संतोष बाळु पवार (23, रा. पानेशत रोड, खानापूर, हवेली,पुणे), साई राजेंद्र कुंभार (19, रा. खानापूर, ता. हवेली, जि. पुणे) यांचा समावेश होता. याच टोळीतील संतोष बाळू पवार फरार झाला आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील मार्केटयार्ड (Pune) परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची घडना घडली होती. गोळीबार करुन तब्बल 28 लाखांची रोकड लंपास करुन चोर पळून गेले होते. ही घटना दुपारी घडली होती. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.दिवसाढवळ्या झालेल्या या दरोड्याच्या घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. 12 नोव्हेंबर 2022 रोजी ही घटना घडली होती.
याप्रकरणात आरोपींना पोलिसांनी शोध घेऊन जेरबंद केले होते. सदर टोळीवर अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने धमकी देवुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी, शस्त्र बाळगणे, दरोडा, जाळपोळ, दरोडा टाकणे तसेच सामन्य जनतेत दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल केले होते. सीसीटीव्ही फुटेज चेक करुन पोलिसांनी या सगळ्या आरोपींचा शोध घेतला होता. त्यानंतर नवनियुक्त पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी या टोळीवर मोक्का कारवाई केली होती. त्यातीलच एक आरोपी फरार झाल्याने खळबळ उडाली आहे.