Pune Crime Dilip Khedkar : 'त्या' अपहरण प्रकरणात बोगस IAS पूजा खेडकरचे वडील सहभागी, तपासासाठी बंगल्यात पोहोचताच मनोरमा खेडकरने पोलिसांवर कुत्रे सोडले, नेमकं काय घडलं?
Pune Crime Dilip Khedkar : नवी मुंबईतून अपहरण झालेला युवक बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांच्या पुण्यातील बंगल्यात आढळून आला होता.

Pune Crime Dilip Khedkar : नवी मुंबईत घडलेल्या एका अपघातानंतर ट्रक हेल्परच्या अपहरणाने मोठी खळबळ उडाली होती. अपहरण झालेला युवक बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या वडिलांच्या पुण्यातील बंगल्यात आढळून आला होता. या प्रकरणात दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांच्यावर अपहरणात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. तर पत्नी मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांच्यावर पोलिसांवर कुत्रे सोडून आरोपीला पळवून लावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिलीप खेडकर सध्या फरार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी सुमारे सव्वा सातच्या सुमारास, मुलुंड ते ऐरोली मार्गावर एक सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 नंबरच्या लँड क्रूझर गाडीमध्ये अपघात झाला. अपघातानंतर गाडीतील दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेले. यानंतर चालक चंदकुमार चव्हाण यांनी ट्रक मालक विलास ढेंगरे यांना तात्काळ माहिती दिली. यानंतर रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांचा तपास आणि पुण्यात खळबळजनक उलगडा
अपहरणाची तक्रार मिळताच पोलिसांनी कारचा मागोवा घेऊन MH 12 RP 5000 नंबरच्या लँड क्रूझरचा शोध घेतला, ती गाडी पुण्यातील बाणेर रस्त्यावरील एका बंगल्याबाहेर उभी असल्याचे निष्पन्न झाले. हा बंगला पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचा असल्याचे समोर आले.
मनोरमा खेडकरने पोलिसांवर सोडले कुत्रे
पोलीसांनी घरी येऊन दरवाजा उघडण्याची विनंती केली असता, दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. उलट, पोलीसांवर घरातील कुत्रे सोडले, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. काही वेळानंतर प्रल्हाद कुमार याला पोलीसांच्या हवाली करण्यात आले. मात्र याच दरम्यान, दिलीप खेडकर दुसऱ्या रस्त्याने पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.
मनोरमा खेडकरवर गुन्हे दाखल, दिलीप खेडकर फरार
या प्रकारानंतर मनोरमा खेडकर यांच्यावर चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारी कामात अडथळा आणि आरोपीला पळवून लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दिलीप खेडकर हे फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.
आणखी वाचा























