Pune Crime : के एफ सी फ्रॅंचाईजीच्या अमिषाने महिलेची 79 लाखांची फसवणूक, तीन जणांवर गुन्हा दाखल
पुण्यात एका महिलेची तब्बल 79 लाख रुपयांची फसवणूकपुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल गेल्या तीन महिन्यांपासून हा सगळा प्रकार सुरू होता
पुणे : प्रसिद्ध हॉटेल के एफ सी ची (KFC) फ्रॅंचाईजी काढून देतो असे सांगत चोरट्यांनी एका महिलेची तब्बल 79 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा (Pune Cyber Police station) दाखल करण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हा सगळा प्रकार सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला तक्रारदार ही इस्टेट एजंट असून गेल्या काही दिवसांपासून पैशाची गुंतवणूक करण्यासाठी ती महिला कंपनी शोधत होती. गौरव निकम, राहुल शिंदे आणि राहुल मॅथ्यू असे नाव सांगून आरोपीची आणि त्या महिलेची ओळख झाली. या तिघांनी त्या महिलेला केएफसी हॉटेलची फ्रँचाईजी देतो अशी बतावणी केली. सायबर चोरट्यांनी त्या महिलेला चार वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये तब्बल 79 लाख 76 हजार रुपये ऑनलाईन पाठवण्यास सांगितले. एखाद्या मोठ्या हॉटेलची फ्रेंचाईजी मिळते आहे असे वाटल्याने त्या महिलेने त्यांना रक्कम देखील पाठवली.
कंपनीची खोटी वेबसाईट बनवली
हे सायबर चोरटे इतके हुशार होते की, त्यांनी त्या कंपनीचे खोटे कागदपत्र तयार करून देखील महिलेला पाठवले. तसेच के एफ सी ची खोटी वेबसाईट देखील बनवली. पैसे पाठवल्यानंतर त्या सायबर चोरट्यांनी त्या महिलेचा ना फोन उचलला ना कुठल्याही ई-मेलला उत्तर दिले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने पोलिसात धाव घेतली. सायबर पोलीस तपास करत आहेत.
सायबर गुन्हे करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बनावट वेबसाइट बनवून नेटकऱ्यांची दिशाभूल करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. पोलिसांनी नागरिकांना यासंदर्भात काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
संबंधित बातम्या :