Ravindra Dhangekar : पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर? एकनाथ शिंदेंना भेटले, स्पष्टीकरण देताना म्हणाले, 'पक्षात जाण्याचा...'
Ravindra Dhangekar : पुण्यातील काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, या भेटीनंतर ते शिंदेगटात जाणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

पुणे: राज्यात गेल्या दोन मोठ्या निवडणुकांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचं दिसून आलं. अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं, वेगवेगळ्या पक्षांमधून निवडणूक लढले, काहींना यश आलं तर काहींना अपयश आलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आमि महानगरपालिका निवडणुकांची रणनिती सर्वच पक्षांकडून आखली जात आहे. त्या दृष्टीने राजकीय पक्ष कामाला लागले आहे. अशातच आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीला महायुतीतील पक्ष धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस आणि ठाकरे गटातील पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धाच महायुतीमध्ये सुरू झाल्या असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत. अशातच शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी काही दिवसांपूर्वी ऑपरेशन टायगर संदर्भात भाष्य करताना काही माजी आमदार व खासदार आमच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल असं म्हणत मोठ्या राजकीय भुकंपाची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर माजी आमदारांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असून काँग्रेसचे माजी आमदार व पुण्यातील रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हेही धनुष्यबाण हाती घेणार असल्याच्या बातम्या काल आल्या होत्या, त्याच कारण म्हणजे धंगेकरांनी शिंदेंची घेतलेली भेट. त्यावरती आज धंगेकरांनी भाष्य करत त्यांच्या पुढच्या निर्णयाबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे.
पक्षप्रवेशावर काय म्हणाले धंगेकर?
एबीपी माझाला याबाबत प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर म्हणाले, "मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. मी कायम विरोध करतो. मात्र, माझी काही काम अडतात. त्यामुळे मी त्यांच्याकडे जाऊन काही कामांचा पाठपुरावा करायला मी त्यांच्याकडे गेलो होतो. मी लढणारा आहे. सध्या कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही. कायम विरोधात लढत आलोय. अजून पण लढत राहील. काल मी माझ्या कामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटलो. माझं व्यक्तीगत काम होतं. कामानिमित्त मला त्यांना भेटायच होतं. पक्षात जाण्याविषयी काही चर्चा काही झाली नाही",असं धंगेकर म्हणालेत.
तर मी शिवसेना शिंदेंच्या पक्षात जाणार नाही. मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त भेटलो. राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत, या नात्याने भेटलो असं रवींद्र धंगेकर म्हणाले. तुम्ही पुढच्या आठवड्यात शिवसेनेत प्रवेश करणार अशी बातमी आहे, या प्रश्नावर धंगेकर म्हणाले की, 'माझा प्रॉब्लेम होता, म्हणून मी भेटलो. पुढच्या आठवड्यात काय, आज जाणार अशी बातमी आहे. पण मी काँग्रेसमध्येच राहणार आहे. मला वाटलं तर उद्या मी अजितदादांना भेटेन. माझी जुनी ओळख आहे', असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
काल (गुरूवारी ता.30) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख एकनाथ शिंदें यांची काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट घेतली. त्यानंतर ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आणि शिवसेनेत प्रवेश करणार याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता खुद्द धंगेकरांनी या सर्व चर्चा आणि शक्यता फेटाळून लावत आपण काँग्रेस (Congress) सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर यांनी आपण एकनाथ शिंदेंना का भेटलो याबाबतची माहिती सांगितली आहे.
























