एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यातील चैत्राली कुलकर्णीच्या हत्येचं गुढ चार वर्षांनंतरही कायम; सुशांत साठीची तत्परता इथं का नाही?
पुण्यातील आयुर्वेद डॉक्टर चैत्राली कुलकर्णी हिच्या हत्येचं गुढ चार वर्षांनंतर देखील उलगडलेले नाही. जो न्याय सुशांत सिंहला तोच न्याय चैत्रालीला का नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
पुणे : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा यासाठी मोठी मोहीम चालवण्यात आली. मात्र, चार वर्षांपूर्वी पुण्यातील आयुर्वेद डॉक्टर चैत्राली कुलकर्णी यांचा देखील असाच संशयास्पद मृत्यू झाला होता. परंतु, तिच्या मृत्यूची चौकशी होऊन तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या तिच्या वडिलांनी आणि आईने जंग जंग पछाडूनही त्यांना दाद मिळालेली नाही. आधी पोलिसांनी आणि त्यांनतर सीआयडीकडे तपास गेल्यानंतरही चैत्रालीच्या मृत्यूचं गूढ उकललेले नाही.
चैत्राली ज्या कॉलेजमध्ये शिकत होती, त्या कॉलेजच्या प्रमुखांचे राज्यातील बड्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे असल्यानं पोलीस या प्रकरणाची चौकशी करत नसल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केलाय. त्याचबरोबर सुशांत सिंह प्रमाणे चैत्रालीच्या मृत्यूची चौकशी देखील सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळं सुशांतला जर न्याय मिळाला असं म्हटलं जात असेल तर चैत्रालीला न्याय कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होतोय. सुशांत सिंह प्रमाणे चैत्रालीच्या मृत्यूची चौकशी देखील सीबीआय मार्फत करण्यात यावी अशी मागणी चैत्रालीच्या आई-वडिलांनी केलीय. आज ना उद्या आपल्या लेकीला न्याय मिळेल आणि तिच्या मृत्यूच्या कारणांचा उलगडा होईल या आशेने सुनील कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी श्रुती कुलकर्णी पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवत आहेत.
आधी पुणे पोलीस आणि त्यानंतर सीआयडीच्या कार्यलयाचे आत्तापर्यंत 97 वेळा त्यांनी उंबरठे झिजवलेत. मात्र, तपास चालू आहे, यापलीकडे त्यांना उत्तर मिळालेलं नाही. 19 संपतेंबर 2016 ला चैत्राली पुण्याजवळील वाघोलीतील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टकडून चालवल्या जाणाऱ्या तिच्या आयुर्वेद कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. पण दुपारी तिच्या वडिलांना तिची बॅग खडकवासला धरणाजवळ सापडली असून ती गायब असल्याचा फोन आला. तिचे वडील लगबगीनं खडकवाला धरणाजवळ पोहचले असता तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. चैत्रालीच्या नातेवाईकांना मृतदेह न दाखवताच तो पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आला, असा तिच्या नातेवाईकांचा आरोप आहे.
पोलीस तपासावर संशय
सुरुवातील या प्रकरणाचा तपास हवेली पोलिसांकडे होता. पण पोलिसांनी ना तिचा मोबाईल तपासाला ना तिच्या कॉल रेकॉर्डच्या आधारे तपास केला, असा तिच्या आई-वडिलांचा आरोप आहे. सुरुवातीला पोलिसांनी चैत्रालीच्या मृत्यूची नोंद आकस्मिक म्हणून केली. परंतु, तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा तिच्या आई-वडिलांचा दावा होता. मात्र, अनेकदा मागणी करूनही पोलीस तपासच करत नसल्याचा दावा सुनील कुलकर्णी यांनी केलाय. अखेर पोलीस स्टेशनला निदर्शनं केल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा जबाब नोदनवून घेतल्याचं सुनील कुलकर्णींनी म्हटलंय.
भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय
आयुर्वेद अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला शिकणारी चैत्राली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्येही सक्रिय होती. मात्र, कॉलेजच्या प्रशासनाशी तिथल्या वातावरणावरून विद्यार्थ्यांचा जो वाद सुरु होता. त्यामुळं ती अस्वस्थ होती. या वादातूनच कॉलजेने तिच्यासोबत दहा विद्यार्थ्यांना कॉलजेमधून काढून टाकण्याचा इशारा दिला होता, असं तिची आई श्रुती कुलकर्णी यांनी म्हटलंय. चैत्रालीच्या मृत्यूचा तपास स्थानिक पोलिसांकडून व्यवस्थित होत नसल्याचा दावा करत चैत्रालीचे आई वडील त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांना अनेकवेळा भेटले. एवढंच नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ती ज्या कॉलेजमध्ये शिकत होती तिथे मोर्चाही काढला.
पुन्हा 'तीच' घटना सुशांतच्या फ्लॅटमध्ये घडणार!
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून केवळ सांत्वन
चंद्रकांत पाटील कुलकर्णी कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरीही गेले. मात्र, तपासात कोणतीही प्रगती झाली नाही. चंद्रकांत पाटील आणि त्यावेळचे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून आपला अपेक्षाभंग झाल्याची भावना कुलकर्णी पती-पत्नी व्यक्त करतात. पुण्यातील भाजप नेत्याचे चैत्राली ज्या आयुर्वेद कॉलजेमध्ये शिकत होती, त्या कॉलेजच्या विश्वस्तांशी असलेल्या लाग्याबांध्यांमुळे पोलीस तपास करत नसल्याचं कुलकर्णी दांपत्याचं म्हणणं आहे. भाजप नेत्यांशी संबंधित कॉलजेच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मोर्चा काढण्याची वेळ चैत्रालीच्या मृत्यूचा तपास व्यवस्थित होत नसल्यानं ओढवली होती. त्यानंतर पोलिसांनी हालचाल केल्याचं दाखवलं पण ते तेवढ्यापुरतच.
सीआयडीकडूनही तपास सुरुच..
स्थानिक पोलिसांकडून दाद मिळत नसल्यानं त्यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री आणि गृहखात्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती त्या देवेंद्र फडणवीसांकडे धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आलं. मात्र, गेल्या तीन वर्षात सीआयडीने कोणता तपास केला हे त्यांना समजू शकलं नाही. या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय हे जाणून घेण्यासाठी या प्रकरणाच्या तपास अधिकारी सीआयडीच्या अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली जाधव यांच्याशी एबीपी माझाने संपर्क केला असता तपास सुरु असल्यानं अधिक काही सांगता येणार नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. तर चैत्राली ज्या भारतीय संस्कृती दर्शनाच्या कॉलेजमध्ये शिकत होती, त्या ट्रस्टचे विश्वस्त सुकुमार सरदेशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन दिवसांत याबद्दल प्रतिक्रिया देतो असं सांगितलंय. एकीकडे सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वच पातळीवर तत्परता दाखवण्यात आली. अशीच तत्परता चैत्रालीच्या मृत्यूची चौकशी करण्याठीही दाखवली जावी एवढीच माफक अपेक्षा, त्यासाठी चार वर्ष झगडणाऱ्या तिच्या आई वडिलांची आहे.
सुशांतसाठी CBI मग चैत्रालीसाठी का नाही? पुण्यातील सुनील कुलकर्णींचा उद्विग्न सवाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
जॅाब माझा
Advertisement