Pune Car Accident: अग्रवाल पितापुत्राचा मस्तवालपणा कायम; CCTV, मोबाईलबाबत पोलीस चौकशीत उडवाउडवीची उत्तरे
Pune News: पुणे अपघात प्रकरणानंतर अजित पवार आणि आमदार सुनील टिंगरे यांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुनील टिंगरे यांनी धनिकपुत्राला वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप आहे. मात्र, त्यांनी हे आरोप नाकारले आहेत.
पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरण सध्या प्रचंड चर्चेत आहे. या अपघात प्रकरणाच्या (Pune Car Accident) चौकशीत अनेक गोष्टींबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अग्रवाल कुटुंबातील बाप-बेटा आणि नातू कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. मात्र, यानंतरही अग्रवाल पिता-पुत्राचा मस्तवालपणा कमी झालेला दिसत नाही. कारण, चौकशीदरम्यान अग्रवाल पिता-पुत्र पोलीस अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती समोर आली आहे. विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) याने त्यांचा मोटारचालक गंगाधर यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली मर्सिडीज गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. विशाल अग्रवाल याने ड्रायव्हर गंगाधरला वडगाव-शेरी येथील बंगल्यात दोन दिवस डांबून ठेवले होते. यावेळी विशाल अग्रवालने त्याचा मोबाइलही काढून घेतला होता. पोलिसांनी याबाबत विचारल्यानंतर विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल (Surendra Kumar Agrawal) उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी न्यायालयात दिली.
विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांनी ड्रायव्हर गंगाधर हरीक्रुब याला बंगल्यात डांबून ठेवले होते. पोलिसांनी या काळातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांनी बंगल्यातील सीसीटीव्ही चित्रीकरणात छेडछाड केल्याचे उघडकीस आले. हे दोघेही पोलिसांना अजिबात सहकार्य करत नाहीत. या दोघांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अपघाताच्यावेळी पोर्शे गाडीत बसलेला दुसरा मुलगा आमदाराचा?
पोर्शे गाडीचा अपघात झाला त्यावेळी गाडीत बसलेला दुसरा मुलगा आमदाराचा होता का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला. देशातील श्रीमंत आणि गरीब लोकांना एकसारखाच न्याय मिळायला हवा. पुण्याच्या प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसत आहे. या अपघातानंतर एक आमदार पहाटे येरवाडा पोलीस ठाण्यात पोहोचला होता. त्यामुळे अपघातावेळी या आमदाराचा मुलगाही पोर्शे गाडीत होता का, याचा तपास व्हावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, असेही नाना पटोले यांनी म्हटले. या सगळ्या आरोपांमुळे सत्ताधरी पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर आमदार सुनील टिंगरे यांच्यामुळे अजित पवार गटही राजकीयदृष्ट्या कोंडीत सापडला आहे. अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे.
आणखी वाचा