Pune Bypoll election : कसब्यात मंत्री गिरीश महाजन प्रचारासाठी गुंडाचा वापर करत आहेत; रुपाली पाटील यांचा आरोप
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत मंत्री गिरीश महाजन हे गुंडांना सोबत घेऊन प्रचार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
Pune Bypoll election : पुण्यातील कसबा पेठ (pune bypoll election)विधानसभा पोटनिवडणुकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे गुंडांना सोबत घेऊन प्रचार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे (rupali patil thombare) यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. पुण्यातील संदीप मोहोळ खुन प्रकरणात ज्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यापैकी संतोष लांडे हा सध्या जामिनावर बाहेर आहे आणि त्याच्यावर याआधी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे. या संतोष लांडेने तो गिरीश महाजनांसोबत प्रचार करत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकलेत, असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे. मतदारांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला आहे.
सत्तेवर आहात म्हणून हिटलर शाही करणार का?
सध्या कसब्यात दोन्ही पक्षांकडून जोरात प्रचार सुरु केला आहे. त्यात एकमेकांवर दोषारोप सुरु केले आहेत. त्यात आता रुपाली ठोंबरेंनी मंत्री गिरीश महाजनांवर आरोप केले आहेत त्या म्हणाल्या की,राज्यात भाजपचं सरकार आहे. त्यात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे. त्यामुळे हिटलर शाही सुरु आहे. ज्या शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यात शहरात भाजप गुन्हेगारांचा वापर प्राचारासाठी करत आहे. हा सगळा प्रकार दुर्दैवी आहे. ज्या गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे किंवा ज्यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे, अशांना सोबत घेत भाजप प्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या मतदारानासाठी 10 दिवस बाकी आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे दिग्गज नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह, त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व नेते कसब्याच्या रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. मात्र भाजपची लोकं कामासाठी आपल्या दारात या पूर्वी कितीवेळा आली, याचा विचार करणारी कसब्याची जनता आहे. गिरीश महाजन हे देखील कसब्यातील अनेक प्रभागांमध्ये प्रचार करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत अनेक भाई आणि गुन्हेगार या प्रचारात दिसत आहेत. गृहखातं भाजपकडे त्यामुळे शहरात भाईगिरी करणाऱ्या लोकांना संरक्षण द्यायचं आणि त्यांच्यामार्फत पोटनिवडणुकीत दमदाटी करुन बैठका घेण्याचं काम सुरु असल्याचंही त्या म्हणाल्या.
यावेळी रुपाली पाटील- ठोंबरे यांनी बरेच प्रश्न उपस्थित केले आहे. मागील अनेक वर्षांपासून कसब्यातील अनेक प्रश्न प्रलंबित होते. 50 कोटी निधी होता. त्यावेळी नागरिकांचे कामं कोणते आहेत. त्यांच्या समस्या कोणत्या आहेत.हे विचारण्यासाठी मागील अनेक वर्षात भाजपमधील कोणीही का आलं नाही?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.