Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ओबीसींनी यंदा...
Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis : छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली.
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना डावलण्यात आल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. छगन भुजबळ सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात माझ्या समावेशासाठी आग्रही असल्याचे वक्तव्य देखील छगन भुजबळ यांनी केले होते. यानंतर आज छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. या भेटीत नेमकं काय घडलं याबाबत छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, आज मी आणि समीर भुजबळ (Sameer Bhujbal) दोघांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अनेक गोष्टींची चर्चा झाली. सामाजिक, राजकीय गोष्टींवर चर्चा झाली. मागील काही दिवसात काय-काय घडलं? आता काय सुरू आहे याबाबत बोलणे झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलंय की, यावेळेस आपल्याला महाविजय मिळालेला आहे. महायुतीच्या मागे ओबीसीचे (OBC) पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभले. ओबीसींनी यावेळेस महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबाबत आपण सर्वप्रथम सर्वांचे आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होणार नाही याची काळजी मला देखील आहे,असे त्यांनी म्हटल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
ओबीसी नेत्यांनी थोडं शांततेनं घावं
ओबीसींचे कदापि नुकसान मी होऊ देणार नाही. पण आता राज्यात जे काही सुरू आहे त्यामुळे मला आठ ते दहा दिवस तुम्ही द्या. आठ, दहा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे काहीतरी चांगला मार्ग यातून काढू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. तर ओबीसी नेत्यांनी थोडं शांततेने घावे, दहा-बारा दिवसात आपल्याला जेवढं काही चांगलं करता येईल त्याबाबत आपण संपूर्ण चर्चा करू, अशी विनंती देखील फडणवीस यांनी केल्याचे छगन भुजबळ म्हणाले आहेत. आता छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या