(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune bypoll election : पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी कॉंग्रेसचा कोणता उमेदवार रिंगणात असणार?
पुणे पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी भाजप आणि कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारांची किंवा ईच्छूकांची चाचपणी सुरु झाली आहे. मात्र भाजपला तह देण्यासाठी कॉंग्रेसचा कोणता उमेदवार रिंगणात असणार?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Pune bypoll election : पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे, असा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनादेखील या लोकसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी करावी लागणार आहे. याच निवडणुकीच्या उमेदवारीसाठी भाजप आणि कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारांची किंवा इच्छुकांची चाचपणी सुरु झाली आहे. मात्र भाजपला शह देण्यासाठी कॉंग्रेसचा कोणता उमेदवार रिंगणात असणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
पुणे लोकसभेसाठी तयारी पुणे निवडणूक विभागाकडून पूर्ण झाली आहे. या निवडणुकीसाठी लागणारे मतदान यंत्र म्हणजेच EVM देखील पुण्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी भाजपचे दिवंगत खासदार यांची जागा कोण भरुन काढणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपमधून इच्छुकांची मोठी यादी आहे. त्यात गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा नावाचा समावेश आहे. यामध्ये आता भाजप नेमकं कोणत्या नेत्याची निवड करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
भाजपला शह देण्यासाठी कोणता उमेदवार रिंगणात असणार?
कॉंग्रेसकडून ही निवडणूक लढवण्यासाठी मोठी तयारी करण्यात येत आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी 40 वर्षांनी कॉंग्रेसला सत्ता स्थापन करता आली होती. त्यानंतर आता गिरीश बापट याच्या जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसने चांगलीच कंबर कसल्याचं दिसत आहे. नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर यांच्या विजयाने कॉंग्रेसला पुण्यात नवा चेहरा मिळाला आहे. आता त्यांची लोकसभेच्या निवडणुकीसाठीदेखील उमेदवारीसाठी चर्चा होत आहे. या उमेदवारीसाठी अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे. यात भाजपला शह देण्यासाठी कोणता उमेदवार रिंगणात असणार?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
लोकसभेची जागा कॉंग्रेसकडेच राहिल?
या लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि कॉंग्रेसने जरी तयारी सुरु केली आहे तरीदेखील राष्ट्रवादीने या जागेवर दावा केला आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनर्स शहरभर लावले होते. त्यावेळी त्यांनीही संधी दिली तर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. महाविकास आघाडीकडून ही जागा कोणाला देणार याची चर्चा रंगत असतानाच लोकसभेची जागा कॉंग्रेसकडेच राहिल असा दावा कॉंग्रेसने केला आहे.
यापूर्वीची राजकीय समीकरणं काय?
परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात 2014 साली अनिल शिरोळे आणि 2019 ला गिरीश बापट तीन लाखांहून अधिक मताधिक्य घेऊन निवडून आले होते. काँग्रेसकडून सुरेश कलमाडींनी वर्षानुवर्षे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. मात्र मागील दोन्ही निवडणुकांमध्ये मोदी लाटेत काँग्रेसचा गड ढासळला. राज्यात तीन पक्षांची मिळून झालेली महाविकास आघाडी आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपकडून हिसकावून घेतलेला कसबा मतदारसंघ यामुळे पुणे लोकसभेची ही पोटनिवडणूक रंगतदार होणार आहे.