Pune Leopard Attack: शेतात खेळताना अनर्थ घडला, दबा धरून बसलेल्या बिबट्याची 8 वर्षीय रोहितवर झडप; चिमुकल्याचा दुदैवी अंत
Pune Leopard Attack: पुणे जिल्ह्याच्या जुन्नर आणि शिरूर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या पारगाव तर्फे आळे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका ८ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय.

Pune Leopard Attack: पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junnar) आणि शिरूर (Shirur) तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या पारगाव तर्फे आळे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) एका ८ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मृत मुलाचे नाव रोहित काफरे (वय 8) असे आहे. रोहित हा शेतमजूर कुटुंबातील मुलगा असून, त्याचे आई-वडील शेतात कांदा लागवडीचे काम करत होते. याचवेळी रोहित शेतालगत खेळत असताना ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. क्षणात घडलेल्या या घटनेत बिबट्याने रोहितला फरफटत नेऊन ठार केले.
Pune Leopard Attack: “अजून किती निष्पाप बळी जाणार?”
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत रोहितचा मृत्यू झाला होता. या घटनेने काफरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील बिबट्याच्या हल्ल्यांमधील ही चौथी मृत्यूची घटना असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावारण पसरले आहे. “अजून किती निष्पाप बळी जाणार?” असा सवाल संतप्त ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
Pune Leopard Attack: प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात
घटनेनंतर वनविभाग आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त, पिंजरे लावणे, गस्त वाढवणे आणि परिसर सुरक्षित करण्याची जोरदार मागणी केली आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांचे जगणे असुरक्षित झाले असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
Pune Leopard : खराडीत बिबट्या आल्याच्या चर्चा; पोलिसांचं आवाहन
दरम्यान, मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात बिबट्या आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यातल्या काही खोट्या तर काही चर्चा खरं आहेत. अशीच चर्चा खराडी परिसरातही रंगली. चक्क पोलिसांनाच फोन करून खराडी परिसरात बिबट्या दिसण्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना बिबट्या दिसला तर आम्हाला कळवा असं म्हणत जनजागृतीही केली.
आणखी वाचा
























