Vanraj Andekar: आंदेकरांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार; एक गोळी नाकावर दुसरी गळ्यावर...; पोस्टमार्टम रिपोर्टमधून माहिती समोर
Vanraj Andekar: आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार झाल्याच्या घटनेनंतर त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती देताना प्राथमिक वैद्यकीय परीक्षण अहवालामध्ये वनराज यांना गोळी लागली नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची गेल्या रविवारी (ता-1) हत्या करण्यात आली. वनराज आंदेकर यांची नियोजनबद्ध पध्दतीने कट रचून निर्घृण हत्या करण्यात आली. आंदेकर यांची हत्या कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर या हत्येमागचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड (Somnath Gaikwad) असल्याच्या संशय आहे, त्याची देखील चौकशी सुरू आहे. दरम्यान आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या त्याचबरोबर त्यांच्यावर कोयत्याने देखील वार करण्यात आले. त्यांचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आला आहे.
आंदेकर (Vanraj Andekar) यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार झाल्याच्या घटनेनंतर त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती देताना प्राथमिक वैद्यकीय परीक्षण अहवालामध्ये वनराज यांना गोळी लागली नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, त्यांच्या अंतिम शवविच्छेदन अहवालातून त्यांना दोन गोळ्या लागल्याचं समोर आलं आहे. आंदेकर यांच्या गळ्यावर एक गोळी लागली होती, तर नाकावर दुसरी गोळी लागली होती. त्यांच्या अंगावर कोयत्याचे 24 वार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नेमकं काय घडलं?
वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्यावर रविवारी(ता-1) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास 6 ते 7 दुचाकीवर आलेल्या टोळक्याने गोळीबार केला, त्याचबरोबर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आंदेकर गंभीर जखमी झाले, आणि उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला. या वेळी ससूनच्या डॉक्टरांच्या प्राथमिक वैद्यकीय अहवालामध्ये त्यांच्यावर पंधरा वार झाल्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं.
त्यांच्यावर गोळीबार झाला मात्र, त्यांना गोळी लागली नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, ससून रुग्णालयात झालेल्या शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालात वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांना दोन गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, त्यांच्यावर 15 नाही तर तब्बल 24 वेळा कोयत्याने वार झाले असल्याचे नमूद केल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांना लागलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गोळी नाकावर, तर एक गोळी गळ्यावर कंठाजवळ लागल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. तर एक गोळी त्यांच्या पॅन्टवर आढळून आली आहे.
या हत्याप्रकरणात पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या तपासात आरोपींकडून पिस्तूल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. ही पिस्तुलं आरोपींनी मध्य प्रदेशातून आणल्याचा खुलासा देखील समोर आला आहे, तर या हत्येमागे सोमनाथ गायकवाड याचा हात असल्याचं बोललं जात आहे.
हत्येमागचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची नियोजनबद्ध पध्दतीने कट रचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आंदेकर यांची हत्या कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर या हत्येमागचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड (Somnath Gaikwad) असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या प्रकरणात आंदेकरांची बहीण, बहिणीचा नवरा, भाचा यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
वनराजची काही चूक नव्हती : बंडू आंदेकर
बंडू आंदेकर म्हणाले, वनराज नाही तर मी टार्गेट होतो. त्यांना आम्हाला मारायचं होतं पण वनराजची हत्या झाली, वनराजची काही चूक नव्हती. मी गुन्हेगारी सोडून आता अनेक वर्षे झाली आहे. आमच्या घरात आता कोणीच गुन्हेगार नाहीत. दोन भाऊ , बहीण बायको मुलगा नगरसेवक झालेत पण आमचा दरारा बघवत नाही म्हणून असं करण्यात आले आहे. आम्ही कोणाचे काही बिघडवलं नाही तरी आम्हाला अडकवतात.
ज्याला मीच मोठा केला आणि आज तोच माझ्यावर उलटला: बंडू आंदेकर
सोमनाथ गायकवाडला मीच मोठा केला आणि आज तोच माझ्यावर उलटला, आणि माझ्याच मुलाची वनराजची हत्या केली. मला न्यायाची अपेक्षा आहे, आता मी बदला वैगेरे घेणार नाही. मी काही केलं तर आता कुटुंब उघडं पडेल असंही यावेळी बंडू आंदेकर यांनी म्हटलं आहे.