Pune News : महाराष्ट्रातील 'या' गावात राजकीय नेत्यांना बंदी, नेमकं काय आहे कारण?
इंदापूर तालुक्यातील पळसदेवमध्ये राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष ,मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष, अशा आशयाचे फ्लेक्स गावात लावले आहेत.
पुणे : सध्या राज्याच्या राजकारणाला नागरिक वैतागलेले दिसत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी राजकारणावर बोलताना सामान्य नागरिक संताप व्यक्त करतात. हेच राजकारण पाहून आणि राज्यातली परिस्थिती पाहून इंदापूर तालुक्यातील पळसदेवमध्ये राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष, अशा आशयाचे बॅनर गावात लावले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वपक्षीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव गावच्या कमानीवर लावण्यात आलेले आहेत. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना आम्ही गावात प्रवेश देणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे.
बॅनरवर नेमकं काय लिहिलंय?
चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष आता फक्त मराठा आरक्षण लक्ष अशा पद्धतीचा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना आम्ही गावात प्रवेश देणार नाही, असंही बॅनरवर लिहिण्यात आलं आहे.
कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश देण्यात येणार नाही...
मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे. राजकारण्यांना मतदानासाठी फक्त मराठा समाज दिसतो. त्यावेळी सगळे नेते मतदान मागण्यासाठी येत असतात. मात्र आता आरक्षण द्यायच्या वेळी सरकार कोणतीही ठाम भूमिका घेत नाही आहे. त्यासोबत कोणताही राजकीय पक्ष ठाम भूमिका घेत नाही. मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळायला हवं. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचं पळसदेव गावातील नागरिकांनी सांगितलं आहे.
आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी मराठा समाजाचे...
राज्यातले अनेक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी मराठा समाजाचे आहेत. तरीही मराठा समाजाची परिस्थिती नीट नाही. त्यांना मूलभूत गोष्टींसाठी भांडावं लागत आहे, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षाच्या नेत्यांनी येऊ नये, असा आक्रमक पावित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.
गावकरी आक्रमक
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 14 दिवस उपोषण केलं. काल मुख्यमंत्र्यांच्या हातून ज्यूस पिऊन त्यांनी आरक्षण सोडलं. मुख्यमंत्र्यांची जरांगे पाटलांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र आरक्षण द्या, असं सकल मराठा समाजाचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे गावकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :