Pune CP Amitesh Kumar : पोलीस आयुक्त की पुढारी? अमितेश कुमारांच्या कामकाजावरून पुण्यात चर्चा, अमितेश कुमार भविष्यात राजकारणात प्रवेश करतील? चर्चांना उधाण
Pune CP Amitesh Kumar : पोलीस आयुक्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत रमलेले दिसतात, अशी टीका होत आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती महापालिका आयुक्तांच्या ऐवजी स्वतः अमितेश कुमार यांनी केल्यानेही वाद निर्माण झाला होता.

पुणे: पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Police Commissioner Amitesh Kumar) हे खरंच पोलीस आयुक्त म्हणून काम पाहत आहेत की पुढाऱ्यांप्रमाणे वागत आहेत, असा सवाल सध्या शहरात चर्चेत आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट, विविध सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांना दिलेली हजेरी आणि त्यांच्या दौऱ्यांसाठी केले जाणारे विशेष बंदोबस्त यामुळेच या चर्चेला उधाण आलं आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात स्वारगेट परिसरातील महालक्ष्मी मंदिरात ते देवीच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र, त्यांच्या भेटीपूर्वी रस्ता जसा मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांसाठी मोकळा केला जातो तसा काही काळ बंद करण्यात आला. त्यामुळे वाहतूक खोळंबली आणि अनेक पुणेकरांना थांबावं लागलं. या घटनेनंतर “पुणे शहराच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्याच दौऱ्यासाठी वाहतूक रोखली जाते, हे नेमकं योग्य आहे का?” असा प्रश्न उपस्थित झाला.(Police Commissioner Amitesh Kumar)
अमितेश कुमार (Police Commissioner Amitesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. काही गुंडांना त्यांनी धडक कारवाईतून धडा शिकवला, मात्र कोयत्यांच्या हल्ल्यांच्या, गोळीबारांच्या आणि सर्रास होत असलेल्या अडवणुकीच्या घटना अद्यापही सुरूच आहेत. अशा पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत रमलेले दिसतात, अशी टीका होत आहे.गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती महापालिका आयुक्तांच्या ऐवजी स्वतः अमितेश कुमार यांनी केल्यानेही वाद निर्माण झाला होता. परंपरेत बदल घडवून आणणारी ही घटना देखील चर्चेचा विषय ठरली होती.
View this post on Instagram
Pune CP Amitesh Kumar : गणपती मंडळांच्या आरत्यांमध्ये, नवरात्र मंडळांच्या कार्यक्रमांत भाषणे
अनेक सण-उत्सवांमध्ये, गणपती मंडळांच्या आरत्यांमध्ये, नवरात्र मंडळांच्या कार्यक्रमांत ते उपस्थित राहून भाषणे देतात, गुन्हेगारांना खुलेआम धमकी देतात आणि त्याचबरोबर सत्कार स्वीकारतात. त्यामुळे ते पोलीस आयुक्त म्हणून कमी आणि पुढारी म्हणून जास्त वागत असल्याची टीका होत आहे. यामुळेच “अमितेश कुमार भविष्यात राजकारणात प्रवेश करतील का?” असा सवाल पुणेकरांमध्ये सर्रास विचारला जात आहे."
Pune CP Amitesh Kumar : अमितेश कुमार येणार म्हणून पुण्यात रस्ते बंद करण्याची नवी प्रथा सुरू
पोलीस आयुक्तांसाठी आता रस्ते बंद करण्याची नवी प्रथा पुण्यात सुरू झाली की काय असा प्रश्न पडावा असं चित्र दिसलं. सारसबागमधील मंदिरात दर्शनासाठी पोलीस आयुक्त येणार असल्याने त्या भागातील सगळी वाहतूकच पोलिसांनी थांबवून ठेवली. त्यामुळे ज्यांच्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न (Pune Traffic) सोडवण्याची जबाबदारी आहे त्यांच्यामुळेच वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुणे पोलीस आयुक्त असेही वारंवार चर्चेत येत आहेत. आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार ज्या भागात जातात, तेथील रस्ते बंद करण्याची नवी प्रथा सध्या पडलेली दिसते. या संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त येणार असल्याने पूर्ण रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आल्याचं दिसतंय.





















