Parth Pawar Land: पार्थ पवार जमीन घोटाळा, तहसीलदार, दुय्यम निबंधकांचं निलंबन; अंजली दमानिया म्हणाल्या, हिंमत असेल तर...
Parth Pawar Land: तहसीलदार सूर्यकांत येवलेंसह उपनिबंधक रवींद्र तारू यांना निलंबित केलं आहे, याप्रकरणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला आहे.

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar Land) यांच्या कंपनीशी संबंधित आणखी एक मोठा जमीन व्यवहार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुण्यातील तब्बल 1800 कोटी रुपयांच्या किंमतीची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकण्यात आली, असा आरोप समोर आला आहे. या व्यवहारात गंभीर अनियमितता झाल्याचं उघड होत असून, केवळ 500 रुपयांच्या स्टँप ड्युटीवर व्यवहार नोंदवला गेल्याचेही प्राथमिक तपासात दिसून आले आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका करत रान उठवले असताना, सरकारने तातडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यातील संबंधित जागा प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, या घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आलं आहे, ही नोंदणीच बेकायदा असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. (Parth Pawar Land)
Parth Pawar Land: तहसीलदार सूर्यकांत येवलेंसह उपनिबंधक रवींद्र तारू यांना केलं निलंबित
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील मोक्याची आणि मोलाची ४० एकर जागेचा बेकायदा व्यवहार करून मूळ मालक आणि सरकारची फसवणूक करीत, पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीने ही जागा खरेदी मुद्रांक शुल्क विभागाच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार पूर्णपणे बेकायदा दिसत असल्याचे दाखवून पुण्यातील उपनिबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई मुद्रांक शुल्क विभागाने केली आहे.
Parth Pawar Land: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीव्र नाराजी
पार्थ पवारांना 1800 कोटींची जमीन 300 कोटी रुपयांत विकल्याचे प्रकरण उजेडात आले, विशेष म्हणजे या व्यवहारात स्टँप ड्युटीही 500 फक्त आकारण्यात आल्याचे दिसून आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, व्यवहारात अनियमितता झाली असेल तर ते चुकीचं आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर कारवाई झालीच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी दुपारी 12 वाजता कारवाईचे संकेत दिल्यानंतर आता 2 तासांच्या आतच याप्रकरणात तहसलिदारांचे निलंबन करण्यात आलं आहे.
Parth Pawar Land: अंजली दमानिया म्हणाल्या, हिंमत असेल तर...
पुणे पार्थ पवार यांच्या कंपनीला देण्यात आलेल्या जमीन प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत हल्लाबोल केला आहे, त्यांनी म्हटलं, पुण्यातील तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन पहिली कारवाई. फक्त अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका. हिम्मत असेल तर कारवाई अजित पवारांवर करा, अशा शब्दांत त्यांनी एक प्रकारे आव्हान दिले आहे.
पुण्यातील तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन पहिली कारवाई.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) November 6, 2025
फक्त अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका. हिम्मत असेल तर कारवाई अजित पवारांवर करा.
Amadea Holdings LLP ही केवळ पार्थ पवार यांचीच कंपनी आहे. दिग्विजय पाटील हे नाममात्र पार्टनर आहेत. १,००,००० च्या भांडवलात, ९९००० हे पार्थ पवार यांचे आहेत (९९%), आणि १००० हे दिग्विजय पाटलांचे आहेत (१%). ह्याला सगळा नफा देखील पार्थ पवारांच मिळत होता. ह्या कंपनी मध्ये ३१/०३/२०२५ पर्यंत ह्या कंपनीत पैसे देखील नव्हते. इंटीरियर ची कामे घेणारी कंपनी आहे. ह्या कंपनीत पार्थ पवार यांना मिळणारा पगार देखील ५२ लाख आहे तर दिग्विजय यांचा पगार फक्त ५३,००० आहे, असंही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत म्हटलं आहे.
Amadea Holdings LLP ही केवळ पार्थ पवार यांचीच कंपनी आहे. दिग्विजय पाटील हे नाममात्र पार्टनर आहेत.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) November 6, 2025
१,००,००० च्या भांडवलात, ९९००० हे पार्थ पवार यांचे आहेत (९९%), आणि १००० हे दिग्विजय पाटलांचे आहेत (१%). ह्याला सगळा नफा देखील पार्थ पवारांच मिळत होता. ह्या कंपनी मध्ये ३१/०३/२०२५… pic.twitter.com/keyCP7skWj























