मोठी बातमी : वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचे जुने प्रकरण समोर, मारहाणी प्रकरणी 3 वर्षापूर्वीच गुन्हा
Vaishnavi Hagawane death: हगवणेंचे वकील विपुल दुशींग यांच्यावरती देखील मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. वकील दुशींग यांनी युक्तीवादाच्या दरम्यान वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे.

पुणे: वैष्णवी आत्महत्येला (Vaishnavi Hagawane death) प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या हगवणे कुटुंबातील आरोपींची बाजू न्यायालयात वकील विपुल दुशींग यांच्याकडून मांडली जातं आहे. वकील दुशींग यांनी युक्तीवादाच्या दरम्यान वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे. मात्र या वकिल विपुल (Vipul Dushing) दुशींग यांच्यावरच सरकारी वकीलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे.
वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात वकिल दुशींग हे 2022 मधे एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते. न्यायाधीशांसमोर सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची यावरुन त्यांचे सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासोबत वाद झाला. त्यामुळे चिडून न्यायालयातून बाहेर पडल्यावर वकील दुशींग यांनी सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली.अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर वकील दुशींग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन वकीलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यावेळी अटक पुर्व जामीन दिल्याने दुशींग यांची अटक त्यावेळी टळली होती.
हगवणेंच्या वकिलांनी कोर्टात काय केले दावे?
हगवणे कुटुंबाने वैष्णवीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केलेत. हगवणेंच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात वैष्णवीच्या चारित्र्यावरच शंका उपस्थित केली आहे. हगवणेंनी वकिलांमार्फत वैष्णवीच्या मृत्यूचे वेगवेगळे मुद्दे मांडत बचाव करण्याचं काम सुरू केलं आहे. हगवणे कुटुंबाची बाजू अॅड. विपुल दुशिंग यांनी मांडली. आपल्या युक्तिवादामध्ये दुशिंग यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच बोट ठेवलं. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता. त्यासाठी ती कॉल करत होती. वैष्णवीला समोरच्या व्यक्तीला नकार दिला असेल, म्हणूनच तिने आत्महत्या केली असेल, असं त्यांनी कोर्टासमोर म्हटलं आहे.
तिची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती
तसेच, वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करण्याची होती. तिने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा तिने उंदीर मारण्याचं औषध घेतलं होतं. तर एकदा तिने गाडीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा युक्तीवाद दुशिंग यांनी केला.
सोने गहाण ठेवण्यास वैष्णवी यांनी विरोध केला नव्हता
व्यवसायासाठी पैशांची आवश्यकता असल्याने हगवणे कुटुंबातील सर्वांचे सोने गहाण ठेवण्यात आले होते. हे सोने गहाण ठेवण्यास वैष्णवी यांनी विरोध केला नव्हता. त्याबाबतचा काही उल्लेख देखील या प्रकरणात दाखल असलेल्या फिर्यादीत नाही. वैष्णवी यांनी एका तरुणाशी केलेले चॅटिंग पती शशांक यांना मिळालं होतं. त्यावरून दोघांत वाद झाला होता. ही बाब हगवणे यांनी वैष्णवी यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर कस्पटे कुटुंबीयांनी वैष्णवी यांचा मोबाईल काढून घेतला होता, असा युक्तिवाद अॅड. दुशिंग यांनी न्यायालयात केला आहे.























