Pune Vandana Chavan : खासदार वंदना चव्हाण यांचा G-20 परिषदेवर आक्षेप; लोकप्रतिनिधींना डावलल्याचा आरोप
राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी जी-20 परिषदेवर आक्षेप घेतला आहे. पुण्यात ही परिषद होणं अभिमानाची गोष्ट आहे पण लोकप्रतिनिधींना यात डावललं गेलं आहे, असा त्यांनी आरोप केला आहे.
Pune Vandana Chavan : राज्यसभा खासदार वंदना चव्हाण (Vandana Chavan) यांनी G-20 (G-20 Pune) परिषदेवर आक्षेप घेतला आहे. पुण्यात ही परिषद होणं अभिमानाची गोष्ट आहे पण लोकप्रतिनिधींना यात डावललं गेलं आहे, असा त्यांनी आरोप केला आहे. या परिषदमध्ये खासदारांना मिरवण्यास जायचे नव्हते परंतु उद्घाटन कार्यक्रमात तरी सहभागी करुन घेणे गरजेचे होते, असंही त्या म्हणाल्या.
आमदार, खासदार, माजी महापौर यापैकी कुणालाही आमंत्रण नसणं आश्चर्य वाटणारे आहे. विद्यमान खासदार गिरीश बापट यांना देखील आमंत्रण नाही. आम्हाला व्यासपीठावर बसायची हौस नाही पण ज्या विषयांवर चर्चा होणार होती ते किमान ऐकायला म्हणून बोलवायला हवं होतं. परिषदेच्या माध्यमातून पुण्याच्या विकासावर चर्चा होईल, आम्हाला कामाची दिशा मिळाली असती त्यामुळे किमान ऐकू द्यायला, उद्घाटनाला बोलवायला हवं होतं. मात्र आम्हाला सगळ्यांनाच डावलल गेलं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
... तर शहराच्या विकासाच्या बाबतीत दिशा मिळाली असती
ही परिषद फक्त पुण्यातच नाही तर अनेक शहरांमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात पुण्यात होणार असल्याने आमच्या सगळ्यांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या परिषदेसाठी आम्ही सगळेच उत्सुक होतो. त्यामुळे या परिषदेसाठी आमंत्रण येईल या आशेने सगळे आमदार आणि खासदार थांबले होते. मात्र आम्हाला परिषदेसाठी निमंत्रण आलं नाही. या सारख्या परिषदांमध्ये अनेक गोष्टींवर चर्चा होते. त्यात शहरासाठी काय करणं अपेक्षित आहे, याबाबत आम्हाला माहिती मिळाली असती. यापूर्वी आम्ही अनेकांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अशा अनेक परिषदेत सहभागी झालो आहोत. त्यानंतर अनेक कामांबाबत माहिती मिळाली किंवा त्यासंदर्भात वेगळ्या संकल्पना सुचल्या आहेत. त्यामुळे परिषदेशाठी निमंत्रण नसणं हे आश्चर्यकारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सुशोभीकरणावर प्रश्नचिन्ह?
पुणे शहरात कचऱ्याची मोठी समस्या आहे. त्यात अनेकदा झाडंदेखील कापल्याचं समोर आलं आहे. अस्वच्छता आणि खराब भिंती हे नेहमी दिसतं. G-20 परिषदेसाठी शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे. अर्थाच विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी हे सौंदर्यीकरण करण्यात आलं आहे. मात्र हे नेहमीच असं राहणं गरजेचं आहे. मात्र ज्या पद्धतीने हे सौंदर्यीकरण करण्यात आलं आहे ते पुणे शहराला शोभण्यासारखं नाही आहे. भिंतींवर चित्र काढली आहेत मात्र ती नीट काढलेली नाही. काहीतरी करायची म्हणून त्यांनी कामं किंवा रंगरंगोटी केली आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.