(Source: Poll of Polls)
Chinchwad bypolls : कुत्र्याच्या अन् उंदराच्या नसबंदीतून भ्रष्टाचार, धनंजय मुंडेंचा आरोप
Dhananjay Munde : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली, अन् यांनी सत्तेच्या सिंहासनासाठी सुरतेसमोर लोटांगण घातलं असं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
Dhananjay Munde : कुत्र्याच्या आणि उंदराच्या नसबंदीतून भ्रष्टाचार होतोय, कधी ऐकलं होतं का तुम्ही. पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत असे भ्रष्टाचार झाले आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारसभेत जयंत पाटील, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, रोहित आर आर पाटील यांची जाहीर सभा झाली.
खरं तर ही पोटनिवडणूक लागायला नको होती. दिवंगत लक्ष्मण जगताप माझे मित्र, असं वाटलं नव्हतं ते इतक्या लवकर जातील. पण दुर्दैवाने ते आपल्याला सोडून गेले अन् पोटनिवडणुक लागली. त्या दिवशी मी लक्ष्मण भाऊंच्या 32 वर्षाचा कार्यकाळ माझ्या नजरेसमोर आलं. यातील 25 वर्ष त्यांच्या डोक्यावर शरद पवार आणि अजित पवारांचा हात होता, तेव्हा त्यांना सोन्याचे दिवस होते. नंतर त्यांना काय मिळालं हे तुमच्या समोर आहे. अजित पवारांनी स्वतःच्या बारामतीवर जेवढं प्रेम केलं त्यापेक्षा तसुभर तरी जास्त प्रेम पिंपरी चिंचवडवर केलं. भावनिक व्हायचं असेल तर अजित पवारांवर व्हा. कारण दिवंगत लक्ष्मण जगताप हे गेली सात वर्षे भाजपमध्ये किती गुदरमले हे तुम्हाला माहितच आहे. त्यामुळं ही भावना मतदानातून व्यक्त करा, असे आवाहन यावेळी मुंडेंनी केलं.
बनवाबनवी करत सत्ता आणली -
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली, अन् यांनी सत्तेच्या सिंहासनासाठी सुरतेसमोर लोटांगण घातलं. हाच इतिहास येणाऱ्या पिढीने ऐकावं असं वाटत नसेल तर तुम्ही यांना दाखवून द्या. यांना सत्तेतून हद्दपार करा आणि लोकशाही जिवंत आहे हे दाखवून द्या, असे धनंजय मुंडे म्हणाले. अशी ही बनवाबनवी आधी चित्रपट आला त्यानंतर अशी ही पळवापळवी चित्रपट आला. सध्या राज्यात अशीच सत्ता आलीये. बनवाबनवी करत सत्ता आणली आणि आता सगळंच गुजरातला पळवायला लागलेत, असेही मुंडे म्हणाले.
उद्योगानंतर देवांची पळवापळवी -
अख्ख्या देशाला माहितीये बारा जोतिर्लिंगांपैकी सहावं जोतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर आणि ते मंदिर पळवायला लागलेत. अहो आत्तापर्यंत पाचपैकी तीन जोतिर्लिंग पळवले यांनी. अधिवेशनात आम्ही ह्यांना विचारणार आहोत, उद्या हे आपला विठ्ठल गुजरातला नेतील, ते काय म्हणणार, आम्ही तिरुपती आणून देतो म्हणतील. अरे काय रे, उद्योगानंतर देवांची पळवापळवी सुरू केलीय, असे धनंजय मुंडे म्हणाले.
आमचं सरकार खोक्यांनी गेलं -
पंतप्रधान नरेंद्र मोदी होऊन नऊ वर्षे झाले, त्यानंतर ही हिंदूंना मोर्चे काढायला लागतायेत. मग काय केलं यांनी. आमचं सरकार खोक्यांनी गेलं, नाना काटे आता तुमची आमदारकी पाकिटांनी जाईल. मतदारांनो पाकिटांना बळी पडू नका. भावनिक होऊ नका. पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी मतदान करा, असे आवाहन मुंडेंनी यावेळी केलं.