एक्स्प्लोर
Virginity intact operation | कौमार्य शस्त्रक्रियेकडे तरुणींचा वाढता ओढा
स्त्रीचं योनीपटल धकाधकीचं जीवन, खेळ, व्यायाम यामुळेही फाटू शकतं, हे अनेकांना माहित असतानाही योनिशुचितेच्या संकल्पना डोक्यातून पुसल्या जात नसल्याने तरुणींवर कौमार्य शस्त्रक्रिया करुन घेण्याची वेळ येत असल्याचं समोर आलं आहे

फोटो सौजन्य - गेट्टी इमेजेस
मुंबई/पुणे : पुरोगामीपणाचा ढोल बडवणाऱ्या महाराष्ट्राची मान खाली घालणारी बातमी समोर आली आहे. लग्नानंतर पहिल्या रात्री 'वर्जिनिटी' सिद्ध करण्यासाठी तरुणी कौमार्य शस्त्रक्रिया करुन घेत असल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालं आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाने कौमार्य चाचणी ही अवैज्ञानिक असल्याचं मान्य करत याविषयीचा वैद्यकीय अभ्यासक्रम वगळला होता. मात्र अभ्यासक्रमातून वगळली असली, तरी बुरसटलेल्या डोक्यातून 'कौमार्या'ची संकल्पना काही केल्या जाताना दिसत नाही. म्हणूनच लग्नानंतरच्या पहिल्या रात्री कौमार्य सिद्ध करण्यासाठी तरुणी कौमार्य शस्त्रक्रिया करुन घेत आहेत.
लग्न म्हटलं की लगबग, गडबड आलीच. पण यासोबत नववधूंसाठी लग्नकाळात एक धास्तावलेपणही आहे. आयुष्यात येणाऱ्या या नव्या टप्प्याच्या उत्सुकतेसोबतच एका अमानुष परीक्षेला सामोरं जावं लागण्याचं आणि त्यात पास होऊन दाखवण्याचं प्रेशर आहे. ही परीक्षा आहे कौमार्याची... जिथे लग्नानंतरच्या पहिल्या रात्री जोडीदाराचा जन्मभराचा विश्वास आणि प्रेम याच परीक्षेवर अवलंबून असतो, तिथे या परीक्षेत पास होण्यासाठी अगदी काहीही करण्याची तयारी ठेवली जाते.. .आणि समोर येतं ते दाहक, विदारक सत्य...
स्त्री-रोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार सध्या कौमार्य शस्त्रक्रियेकडे तरुणींचा कल वाढत चालला आहे. लग्नसराईच्या काळात अशा शस्त्रक्रियांच्या चौकशीतही वाढ होते. दहा-पंधरा वर्ष आधी तर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात, याची माहितीही नव्हती. मात्र गेल्या पाच वर्षांत या शस्त्रक्रियांना मागणी वाढली आहे.
मूळातच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून कौमार्य चाचणी अवैज्ञानिक ठरवली गेली आहे. स्त्रीचं योनीपटल हे केवळ शरीरसंबंधामुळेच नाही, तर धकाधकीचं जीवन, खेळ, व्यायाम यामुळेही फाटू शकतं, हेही अनेकांना माहित आहे. मात्र तरीही योनिशुचितेच्या संकल्पना डोक्यातून पुसल्या जात नाहीत आणि तरुणींवर कौमार्य शस्त्रक्रिया करुन घेण्याची वेळ येते.
VIDEO | कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीची कीड कधी संपणार? | स्पेशल रिपोर्ट | पुणे
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आधी केवळ सधन कुटुंबातील स्त्रिया अशा शस्त्रक्रिया करुन घेत असत. मात्र, आता या शस्त्रक्रिया
10 ते 50 हजारात होऊ शकतात. कमी वेळात आणि त्यातल्या त्यात परवडेल अशा दरात ही शस्त्रक्रिया होते. त्यामुळे कौमार्य शस्त्रक्रियेचं हे लोण मध्यमवर्गापर्यंतही पोहोचलं आहे. मध्यमवर्गातल्या तरुणींवरही कौमार्य शस्त्रक्रिया करुन घेण्याचा ताण असणं ही धक्कादायक बाब त्यामुळे समोर येते.
कौमार्य शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते ती कौमार्य चाचणीच्या अमानुष पद्धतीमुळे. कंजारभाट समाजातील तरुण-तरुणींनी एकत्र येत याविरोधात आवाज उठवला. त्यांना काही प्रमाणात यशही आलं. मात्र कौमार्य चाचणीसारखी अमानुष परंपरा केवळ कंजारभाट समाजातच नाही, हे कौमार्य शस्त्रक्रियांकडे वाढता कल पाहाता सिद्ध झालंय
एकीकडे काही बुरसटलेली डोकी आणि त्या डोक्यांनी भरलेला समाज मुलींकडे त्यांच्या कौमार्याचा पुरावा मागतो. त्यामुळे काही मुली दबावाखाली येऊन कौमार्य सिद्ध करण्याची धडपडही करतात पण, गरज आहे ती अशा दबावाला बळी न पडता मुलींनीही खंबीर राहण्याची...
विज्ञानाची कास धरत माणसाने बरीच प्रगती केली. वैद्यकशास्त्रामुळे तर मरणाच्या दारातले जीव मागे खेचून आणणं शक्य झालं. पण एकीकडे विज्ञान पुढे गेलं असलं तरी काही माणसांची डोकी आणि त्यातले विचार मात्र मागेच राहिले. माणसाच्या बुरसटलेल्या डोक्यांचं सॉफ्टवेअर अपडेट करणारी अद्याप कोणती शस्त्रक्रिया अस्तित्वात नाही. त्यामुळे मुलींवरच कौमार्य शस्त्रक्रिया करुन घेण्याचं प्रेशर आहे. पण विज्ञानाच्या चमत्कारानेच कधी शक्य झालं, तर कौमार्याचा पुरावा मागणाऱ्या या बुरसटलेल्या डोक्यांवरही विवेकी विचारांची शस्त्रक्रिया व्हावी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
