(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोणावळा शहराचा कायापालट, मुकादमांना फ्लेक्सवर स्थान देण्याची शक्कल आली कामी
स्वच्छ भारत अभियानात हॅट्रिक केलेलं लोणावळा आता चौकार मारण्यासाठी कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी मुकादमांना थेट फ्लेक्सवर स्थान देण्यात आले आहे.
पिंपरी : गाव असो की शहरं ही स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी मुकादमांची असते. पण त्याच मुकादमांकडे समाज आणि प्रशासनाचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांना दिलं जाणार स्थान हे सर्वश्रुत आहे. देशात पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात मात्र या मुकादमांना थेट फ्लेक्सवर स्थान देण्यात आलंय आणि त्याचे सकारात्मक परिणाम ही शहरवासीय अनुभवू लागले आहेत.
थंड हवेचे ठिकाण म्हणून देशभरात ओळख असलेलं लोणावळा शहर मोकळा श्वास घेतोय. रस्ते चकाचक, परिसर कचरा आणि दुर्गंधी मुक्त झाल्याने शहराचा असा कायापालट झालाय. त्याला कारण ठरतायेत शहरात ठिकठिकाणी झळकणारे हे फ्लेक्स. प्रत्येक फ्लेक्सवर त्या परिसरातील मुकादमांचा फोटो, नाव, मोबाईल नंबर आणि त्यांनी केलेल्या कारावाईच्या कामाचा तपशील नमूद आहे. या संकल्पनेमुळं मुकादमांना समाजात आदर मिळतोय त्यामुळेच मुकादम देखील चोख काम बजावत आहेत.
मुकादम मारुती पवार म्हणाले, गवळी वाडा प्रभागातील मी मुकादम असून माझी सर्व माहिती आणि कामांचा तपशील फ्लेक्सवर टाकण्यात आलेला आहे. यामुळे नागरिकांना इथल्या मुकादमांची माहिती आहे, त्यांना मदत लागल्यास ते ताबडतोब आमच्याशी संपर्क साधतात. मग आम्ही त्यांची समस्या सोडवतो. आम्ही दिवसातून दोन वेळा परिसर स्वच्छ करतो, नागरिकांचेही त्यावर लक्ष असते. त्यामुळे त्यांना ही फोन करायची वेळ येत नाही. या संकल्पनेमुळं पूर्वीपेक्षा शहर खूप स्वच्छ आणि सुंदर होत आहे. नागरिकांच्या तक्रारी येताच त्याच निरसन करण्याचे आमचे प्रयत्न असतात. आमचे फ्लेक्स पाहून लोक ही आनंदात आहेत. जे आम्हाला आजवर ओळखत नव्हते आता ते हात करून ओळख देतात, हीच आमच्या कामाची पावती आहे.
स्वच्छ शहरांच्या यादीत अग्रस्थान पटकविण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने ही शक्कल लढवली आहे. लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या, स्वच्छ भारत अभियानात लोणावळ्याला आत्तापर्यंत तीन पारितोषिके मिळवली असून, चाळीस कोटींचं बक्षीस प्राप्त झालंय. आता आम्हाला प्रथम क्रमांक पटकवायचा आहे. त्यासाठी आम्ही शहरात बारा मुकादम नेमले आहेत. त्यांचे फोटो, नाव, मोबाईल नंबर आणि त्या परिसरात त्यांनी काय काम करायचं आहे हे नमूद करणारे फ्लेक्स झळकवले आहेत. नागरिकांनी त्यांच्या परिसरात अस्वछता दिसली, दुर्गंधी पसरली तर थेट या मुकादमांशी संपर्क साधायचा आहे. संपर्क साधल्यानंतर प्रतिसाद न मिळाल्यास त्यांनी नगरपरिषदेकडे तक्रार नोंदवायची आहे, मग आम्ही त्या मुकादमांवर कारवाई करणार आहोत. मात्र आत्तापर्यंत आमच्याकडे एक ही तक्रार प्राप्त झाली नसल्याने, आमची ही संकल्पना सत्यात उतरत आहे.
मुकादमांना थेट फ्लेक्सवर झळकविल्याचं स्वागत शहरवासीयांकडून केला जातोय, शिवाय या संकल्पनेचा ते फायदा ही घेत आहेत. मुकादमांना फोन करताच ते तातडीनं आमच्या परिसरात पोहचत आहेत. आमच्या तक्रारी गांभीर्याने घेत कचरा, गटार स्वच्छ करतायेत. त्यामुळे फ्लेक्स झळकविण्याची ही संकल्पना शहरासाठी खूप चांगली आहे.
स्वच्छ भारत अभियानात हॅट्रिक केलेलं लोणावळा आता चौकार मारण्यासाठी कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी मुकादमांना थेट फ्लेक्सवर स्थान दिलंय. ज्याचे सकारात्मक परिणाम शहरवासीय अनुभवतायेत. याचं अनुकरण तुमच्या शहराने केलं तर तुमचं ही शहर स्वच्छ आणि सुंदर व्हायला वेळ लागणार नाही.