मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
शिंदे गटाकडून भाजपकडे 25 जागा मागण्यात आल्या आहेत. मात्र, त्याबाबतही अजून स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

Ravindra Dhangekar: जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात 'आग्या' मोहोळ उठवणारे शिंदे गटाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोंडी झाली आहे. त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारण्यात आल्याने धंगेकर कोणता वेगळा निर्णय घेणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. रवींद्र धंगेकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने भूवया उंचावल्या आहेत. भाजपने कोंडी केल्याने आता रवींद्र धंगेकर कोणता निर्णय घेण्यात याकडे लक्ष आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुद्धा जागावाटपावरून अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही. शिंदे गटाकडून भाजपकडे 25 जागा मागण्यात आल्या आहेत. मात्र, त्याबाबतही अजून स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
रविंद्र धंगेकर वेगळ्या पर्यायाच्या शोधात?
पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव आणि पत्नी प्रतिभा धंगेकर यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे आता धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष लढण्याच्या तयारीत आहे. या दोघांनाही महायुतीत उमेदवारी मिळावी यासाठी रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत प्रयत्न केले. मात्र, भाजपने प्रभाग 24 मध्ये दोघांनाही उमेदवारी न देऊन त्यांची राजकीय कोंडी केली. भाजपने या प्रभागात गणेश बीडकर, रविंद्र वडके,कल्पना बहिरट, उज्वला यादव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यामुळे आता पत्नी आणि मुलाला महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं असेल तर त्यांना अजित पवारांची राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे दोनच पर्याय उपलब्ध आहे.
25 जणांचे उमेदवारी अर्ज भरून घेण्याचे आदेश
दरम्यान, भाजप- शिवसेना युतीबाबत अजूनही स्पष्टता नाही. मात्र शिंदेंच्या शिवसेनेने पुण्यात 25 उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी सांगितल आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली आहे. युती होणार की नाही याबाबत माहिती अजूनही कोणी दिली नाही आहे. त्यात उद्या अर्ज दाखल करण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सेनेने 25 इच्छुक प्रभागात जणांना फॉर्म भरायला सांगितल आहे. सेना आणि भाजपमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जागेवरून वाटाघाटी सुरूच आहेत. ऐनवेळी कोणतीही गडबड नको म्हणून सध्या सेनेतील 25 इच्छुक फॉर्म भारत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या





















