Pune Vasant More : डावलणं सुरुच?... म्हणून वसंत मोरेंना राज ठाकरेंचा कार्यक्रम उभ्याने बघावा लागला!
राज ठाकरे यांचा कार्यक्रम मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेले मनसेचे फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे यांना उभ्याने बघावा लागला. यामुळे राज ठाकरे त्यांना वारंवार डावलल्याच्या चर्चांणा उधाण.
Vasant More : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यात सक्रिय झाल्याचं चित्र आहेत. त्यांचे पुणे दौरे वाढले आहेत. त्यांचाच एक कार्यक्रम मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेले मनसेचे फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे (Vasant More) यांना उभ्याने बघावा लागला. यामुळे राज ठाकरे त्यांना वारंवार डावलत आहेत का?, अशा चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त अशोक पर्व या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होता. त्यापूर्वी राज ठाकरेंचे पुण्यात अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होते. सगळे कार्यक्रम आटपून राज ठाकरे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पोहोचले. नाट्यगृहात जाण्यापूर्वी त्यांनी पक्षाच्या एका उपक्रमाचं नाट्यगृहाबाहेर उद्घाटन केलं. त्यानंतर ते नाट्यगृहात अशोक पर्व या कार्यक्रमासाठी गेले. राज ठाकरे या कार्यक्रमातील वक्ते असल्याने मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणावर हजेरी लावली. त्यासोबतच अनेक पुणेकरदेखील अशोकपर्व कार्यक्रम बघण्यासाठी हजर होते. त्यावेळी नाट्यगृहात मोठी गर्दी झाली होती. अनेक अशोक सराफांचे चाहते आणि राज ठाकरेंचं भाषण ऐकायला आलेल्या लोकांना उभ्याने कार्यक्रम बघावा लागला. या सगळ्यांमध्ये मात्र वसंत मोरे यांना देखील कार्यक्रम उभ्याने बघावा लागला.
पदाधिकाऱ्यांनीही जागा दिली नाही
राज ठाकरेंचा कार्यक्रम असल्याने मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते होते. वसंत मोरे ज्या ठिकाणी उभे होते त्याच ठिकाणी अनेक पदाधिकारी बसून होते. मात्र एकाही पदाधिकाऱ्याने वसंत मोरे यांना बसायला जागा दिली नसल्याची माहिती आहे.
वसंत मोरेंची नाराजी?
मनसेच्या अंतर्गत वादामुळे काही प्रमाणात मनसेत दोन गट पडले आहेत. वसंत मोरे यांच्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे वसंत मोरे यांच्याबद्दल भूमिका पक्ष दोन दिवसात घेणार, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली होती. निलेश माझिरे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्यासोबत चारशे जणांनी मनसे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पुण्यात मनसे नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत वसंत मोरे यांनी दांडी मारल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. मात्र पक्षाच्या कार्यक्रमात वसंत मोरे यांना डावलल्याचं अनेकदा बघायला मिळालं आहे. मात्र वसंत मोरेंनी पक्ष सोडणार नाही, असं अनेकदा ठणकावून सांगितलं आहे.