Pune News : पुण्यात नवजात अर्भकास शौचालयाच्या भांडयात ठेवले कोंबून, पोलिसांमुळे वाचले चिमुकल्याचे प्राण
Pune news : पुण्यात एका महिलेने नवजात अर्भकास जन्म देऊन शौचालयाच्या भांड्यामध्ये कोंबून ठेवल्याची घटना घडली आहे.
पुणे : अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या एका नवजात अर्भकास ( चिमुकल्या बाळास ) जन्म दिलेल्या नराधम आईनेच पोटच्या गोळ्याला प्रियकराच्या मदतीने सार्वजनिक शौचालयातील भांड्यात कोंबून ठेवल्याची घटना सिंहगडरोड परिसरात घडली आहे. वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगर येथे घडली आहे. परंतु म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी याप्रमाणे या घटनेची माहिती मिळताच देवदूताप्रमाणे सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अजय माळी व कट्टे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून नागरिकांच्या मदतीने परिश्रमाने शौचालयाच्या भांड्यात कोंबलेल्या या नवजात अर्भकास बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक महिला शौचालय समाज मंदिरामागे तुकाई नगर वडगाव येथे एका महिलेने नवजात अर्भकास जन्म देऊन शौचालयाच्या भांड्यामध्ये कोंबून ठेवले आहे, असा कंट्रोल रूमवरून सकाळी आठच्या सुमारास फोन आला. दरम्यान कॉलची माहिती मिळताच ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार माळी व कट्टे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महिला शौचालयात असलेल्या शौचालयाच्या भांड्यात हे नवजात अर्भक कोंबलेले रडत असलेले आढळून आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नागरिकांच्या मदतीने हे चिमुकले बाळ शौचालयाच्या भांड्यातून वर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु हे बाळ अर्धे भांड्यात तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे अवघड झाले. त्यातच रक्तश्राव होत होता.त्यामुळे त्यांनी हाताला तेल लावून त्या चिमुकल्या बाळाला कसे बसे भांड्यातून मोठ्या परिश्रमाने बाहेर काढले आणि पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले.
सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली व माळी व कट्टे यांचे अभिनंदन केले. दरम्यान या निर्दयी प्रकारामुळे तुकाई नगर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निर्दयी महिलेस आणि तिला साथ देणाऱ्या तिच्या प्रियकरास ताबडतोड अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
हे नवजात अर्भक मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अमलदार अजय माळी यांनी सदर महिलेविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे.