(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजकारणात यायच्या भानगडीत पडू नका.. राजकारणाचं काही खरं नाही : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पुणे येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांचा असाच रोखठोकपणा पाहायला मिळाला.
पुणे : राजकारणात काही खरं नाही. पण आता मी याच राजकारणात अडकलोय, हालता ही येईना अन् कुठं जाताही येईना. अशी माझी अवस्था झाली असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर कबुली दिली. शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुणे जिल्हा परिषदेने गौरव केला. तेव्हा अजित पवार स्वतः शिक्षकांच्या भूमिकेत पहायला मिळाले. त्याच नात्याने त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक मोलाचे सल्ले दिले.
तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं तिथं जा पण आमच्या क्षेत्रात येण्याच्या भानगडीत पडू नका. हे राजकारण काही खरं नाही. मी यात अडकलोय तसं तुम्ही ज्या क्षेत्रात जाल तिकडं अडकू नका. तिथं तुमच्यासह आई-वडील आणि पंचक्रोशीचं नाव कमवा. असा सल्ला अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्याचवेळी पोट सुटलेल्या पुढाऱ्यांना चिमटाही काढला.
पूर्व उच्च माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील 106 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यांना अजित पवारांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी भारताच्या तेजोमय विकासासाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत दाखल व्हायचे प्रयत्न नक्की करा. असं शिक्षकांच्या भूमिकेत असलेल्या पवारांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं. याशिवाय ज्यांना लिखाणात आवड आहे त्यांनी लेखक व्हा, अभिनय, गायन येत असेल त्यांनी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावा, अगदी शेतीत मन रमत असेल तर प्रगतशील शेतकरी व्हा. पण आमच्या क्षेत्रात जास्त येण्याच्या भानगडीत पडू नका.
पुढाऱ्यांना काढला चिमटा राजकारणात काही खरं नाही. आता तुम्ही म्हणाल तू कसा काय आला राजकारणात? पण आता हालता ही येईना अन् कुठं जाता येईना. अशी माझी अवस्था झालीये. पण मी जसं या राजकारणात अडकलोय, तसं तुम्ही कुठं अडकू नका. तुम्हाला ज्या क्षेत्राची आवड आहे, मग अगदी राजकारणात यायचं असेल तरी त्यात तुमच्यासह आई-वडील आणि पंचक्रोशीचं नाव कमवा. असा अजित पवारांनी विध्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला. तेव्हाच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करा. नाहीतर तुम्ही पाहता आमच्यातले अनेक पुढारी फुगलेले असतात, त्यांना कधी कळायचं काय माहित. ही मुलं म्हणतील मंचावर बसलेल्यांना आधी सांगा मग आम्हाला व्यायाम करायला सांगा. असं म्हणत अजित पवारांनी पुढाऱ्यांना काढलेल्या चिमट्याने सभागृहात एकच हशा पिकला.