Karvi Flower: कास पठार अवतरलं लोणावळ्यात! 7 वर्षांनी दिसणारं दुर्मीळ फूल पुण्यात, यंदा नाही पाहिली तर पुन्हा वाट पाहावी लागणार
Lonavala Karvi Flower Festival : पावसाळ्यात लोक लोणावळ्याच्या पर्यटनांना या ठिकाणी येण्यास भुशी धरण, लायन पॉईंट, टायगर पॉईंट यासह इतर पर्यटन ठिकाणी जात असतात मात्र आता या कार्वीच्या फुलांनी पर्यटकांना भुरळ घातली आहे.
पुणे : साताऱ्यातील कास पठार चक्क पुण्यात (Pune) देखील अवतरलंय. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या लोणावळ्यात कार्वी फुलं बहरलीत. टायगर पॉईंटच्या तीन किलोमीटर पुढं असणाऱ्या या पठाराकडे ही आता पर्यटकांचे पाय ओढले जातायेत. खरंतर या कार्वी फुलांचं आयुष्य फार वेगळं आहे. कारण ही फुलं बहरायला सहा ते सात वर्षांचा कालावधी घेतात. यंदा हा योग जुळून आला आहे. त्यामुळंच नेहमी हिरवंगार दिसणारं हे पठार यंदा जांभळ्या रंगाच्या कार्वी फुलांनी नटून गेलं आहे. नटलेला हा पठार पर्यटकांना ही आकर्षित करतोय, त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण भरतोय.
सात ते आठ वर्षातून येणारी ही कार्वीची फुले मावळ तालुक्यातील या भागात पर्यटकांना भुरळ घालताना दिसत आहेत. कार्वी नावाचे हे फुल आणि निसर्गाची ही किमया लोणावळ्यात (Lonavala) दिसत असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. विकेंडला या ठिकाणी मोठ्या प्रमाणालर लोक येतात.
लोणावळ्यातील (Lonavala) 30 ते 35 एकरच्या पठारावर ही कार्वीची फुले फुलल्यामुळे मावळ तालुक्यासह मुंबई, पुण्याचे पर्यटक या ठिकाणी येत आहेत. या बहरलेल्या फुलांचा आनंद घेताना दिसत आहेत. दरवर्षी साताऱ्यातील कास पठारावर आलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचा आनंद घेण्यासाठी, ती फुलं पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करतात. त्याचप्रमाणे आता लोणावळ्यातील (Lonavala) या टायगर पॉईंटपासून साधारणत: तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या या पठारावर आता नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे.
लांबच लांब पर्यंत एकाच जांभळ्या निळ्या रंगामध्ये ही सगळी फुलं बहरल्यामुळे ती पर्यटकांना आकर्षित करतात. या ठिकाणी जिथंपर्यंत नजर जावी तिथपर्यंत कार्वीच्या फुलांचा बहर दिसतो. पावसाळ्यात लोक लोणावळ्याच्या (Lonavala) पर्यटनांना या ठिकाणी येण्यास भुशी धरण, लायन पॉईंट, टायगर पॉईंट यासह इतर पर्यटन ठिकाणी जात असतात मात्र आता या कार्वीच्या फुलांनी पर्यटकांना भुरळ घातली आहे. लोणावळ्यातील (Lonavala) लायन्स पाईंट कडून कोरीगड किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर दोन्ही बाजूला असलेल्या पठावरांवर ही फुल बहरली आहेत.
दरम्यान लोणावळ्यात (Lonavala) फुललेल्या फुलांचं नाव आहे ‘कार्वी’ असून हे एक दुर्मीळ झुडूप आहे. जे प्रामुख्याने पश्चिम घाटाच्या सखल टेकड्यांमध्ये, गड किल्ले, जंगले आणि संपूर्ण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर ती आपल्याला दिसून येतात. सात वर्षातून एकदाच याला फुलं उमलतात. त्यामुळे लोक या फुलांना पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.