गंगा जशी नाल्यांनी प्रदुषित झाली तसाच संघ सुद्धा प्रदुषित होण्याची शक्यता! भाजपच्या सरसकट आयाराम धोरणावर गोविंद गिरी महाराजांचा अप्रत्यक्ष टोला
Govind Giri Maharaj: भाजपमधील आयारामांबदल गोविंद गिरी महाराज यांनी जाहीर वक्तव्य करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सावध राहिले पाहिजे असे म्हटलं आहे.

Govind Giri Maharaj: भ्रष्टाचार, देशद्रोहाचे गंभीर आरोप करायचे आणि त्यानंतर त्यांनाच पक्षात घ्यायचं असा प्रघात भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडला आहे. त्यामुळे भाजप आता वॉशिंग मशीन झाल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. ही टीका फक्त महाराष्ट्रामध्ये होत नसून देशभरामध्ये भाजपवर ही टीका केली जात आहे. ज्यांच्यावर अत्यंत गंभीरमधील गंभीर आरोप आहेत त्यांना सुद्धा भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता गोविंद गिरी महाराज यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपला खोचक टोला लगावला आहे. भाजपमधील आयारामांबदल गोविंद गिरी महाराज यांनी जाहीर वक्तव्य करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सावध राहिले पाहिजे असे म्हटलं आहे.
मृत्युंजय भारत या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलताना गोविंद गिरी महाराज यांनी भाजपला आयाराम पॉलिसीवरून खडेबोल सुनावले. ते म्हणाले की, ज्यांनी कधी संघही पाहिला नव्हता, ज्यांना कधी हिंदुत्वही पटलं नव्हतं अशा लोकांची आयात केली तर गंगा जशी नाल्याने प्रदूषित झाली आहे तसा संघ सुद्धा प्रदूषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवेगळी आयात केलेली मंडळी येत आहेत त्यावर संघाने सावध राहिले पाहिजे असं त्यांनी म्हटल आहे. त्यामुळे भाजपमध्ये होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील इनकमिंगवर गोविंद गिरी महाराज यांनी भाजपचे कान टोचले आहेत.
कोण आहेत स्वामी गोविंदगिरी महाराज?
स्वामी गोविंद देव गिरी (किशोर मदनगोपाल व्यास) यांचा जन्म 1949 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूर या छोट्याशा गावात एका धार्मिक, ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना प्राचीन अध्यात्मिक शास्त्रांचा अभ्यास, भक्ती आणि कटिबद्ध धार्मिकतेचा वारसा कौटुंबिक परंपरेतून आणि पालकांकडून मिळाला. गोविंद देव गिरी महाराज यांनी त्यांच्या मुळ गावीच आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी स्थापन केलेल्या तत्वज्ञान विद्यापीठात दाखल झाले. ज्यांनी स्वाध्याय नावाची क्रांतिकारी सामाजिक-धार्मिक चळवळ सुरू केली. पांडुरंग शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी बी.ए. तत्वज्ञानमध्ये पदवी घेतली.
पुढील शिक्षणासाठी गोविंद देव गिरी महाराज वाराणसीत गेले, तेथे त्यांनी ‘दर्शनाचार्य’ ही पदवी प्राप्त केली. वाराणसीत त्यांना प्रसिद्ध वैदिक अभ्यासक, वेदमूर्ती डॉ. विश्वनाथजी देव यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचे भाग्य लाभले. दरम्यान 120 वर्षांच्या कौटुंबिक परंपरेला पुढे नेत त्यांनी प्रथम त्यांच्या मूळ गावी श्रीमद्भागवतावरील धार्मिक प्रवचन सादर केले. त्यावेळी तो जेमतेम 17 वर्षांचे होते. आता गेल्या अनेक वर्षापासून ते श्रीमद्भागवत, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध, योग वसिष्ठ आणि भारतीय संस्कृतीचा पाया असलेल्या अध्यात्मिक साहित्याच्या इतर मौल्यवान आणि प्राचीन ग्रंथांवर प्रवचन देत आहेत. त्यांची प्रवचने केवळ भारतातच नव्हे तर नेपाळ, कॅनडा, युनायटेड स्टेट्स, ग्रेट ब्रिटन इत्यादींसह अनेक परदेशातही आयोजित केली जातात.
इतर महत्वाच्या बातम्या

























