हगवणेंच्या मामांची उचलबांगडी, जालिंदर सुपेकरांना पुण्यातून हलवलं; गृह विभागातून निघाली बदलीची ऑर्डर
राज्याच्या गृह विभागाने परित्रक काढून जालिंदर सुपेकर यांची आज बदली केली आहे.

पुणे : वैष्णवी हगवणे (Vaishnavi hagwane) आत्महत्या प्रकरणात दबावतंत्रासाठी नाव आल्यानंतर पुण्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक आणि शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच, भाच्याला बंदुक परवाना मिळवून देण्यासाठी मामा जालिंदर सुपेकर (Jalinder supekar) यांनीच मदत केल्याचा आरोपही आजच सकाळी त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यावर, आपली बाजू मांडताना सुपेकर यांनी सारवासारव केली होती. मात्र, सारवासारव केल्यानंतरही राज्याच्या गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांची पुण्यातून (Pune) उचलबांगडी केली आहे. सुपेकर यांना महाराष्ट्र होमगार्ड उपमहासमादेशक पदावर बदली करण्यात आली आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जालिंदर सुपेकर यांच्याविरुद्ध मीडियातून आवाज उठवला होता. त्यानंतर, कारवाईला वेग आल्याचं दिसून आलं.
राज्याच्या गृह विभागाने परित्रक काढून जालिंदर सुपेकर यांची आज बदली केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 च्या 22) याच्या कलम 22 न मधील तरतुदींनुसार, पुढील तक्त्यातील स्तंभ (2) मध्ये नमूद भा.पो.से. अधिकारी यांची, स्तंभ (3) मध्ये नमूद पदावरुन स्तंभ (4) मध्ये निर्दिष्ट पदावर, याद्वारे, प्रशासकीय कारणास्तव, बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार, पुण्यातील कारागृह व सुधारसेवा विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरुन जालिंदर सुपेकर यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. उपमहासमादेशक होमगार्ड, महाराष्ट्र राज्य या पदावर त्यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. त्यामुळे, जालिंदर सुपेकर यांना मोठी जबाबदारी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
हा शासन आदेश, आस्थापना मंडळ क्र. 1 च्या शिफारशींचा यथायोग्य विचार करुन व महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 22 न मध्ये नमूद सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने हा आदेश पारीत करण्यात आला आहे.
भाच्याला बंदुक परवान्यसाठी मामांची स्वाक्षरी
जालींदर सुपेकर हे सध्या विशेष पोलीस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते. तिथुन त्यांची बदली पदावनती करुन उप महासमादेशक होमगार्ड या पदावर करण्यात आल्याच गृह वाभागाने काढलेल्या आदेशात म्हटलंय. जालींदर सुपेकर हे वादग्रस्त हगवणे बंधुंचे मामा आहेत. त्यांच्याच, सहीने सुशील आणि शशांकला शस्त्र परवाना 2022 मधे शस्त्रपरवाना मिळाल्याचे एबीपी माझाने समोर आणले होते. याप्रकरणी, हगवणे बंधुंनी परवान्यासाठी खोटे पत्ते दिल्याचा गुन्हा नोंद करण्यात आलाय.


















