Sharad Mohol Murder Case : पुण्यातील शरद मोहोळ हत्याकांडात 'कराड' कनेक्शन कसं आलं? गेल्यावर्षीच संपवण्याचा प्लॅन, अटकेतील आरोपींनी काय दावा केला??
Sharad Mohol : शरद मोहोळचा काटा काढण्यासाठी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केल्याचे सुद्धा समोर आले आहे. त्यावेळी आरोपी नितीन खैरे हा मुन्ना पोळेकरसह हजर होता.
पुणे : पुण्यातील कुख्या गुंड, गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol Murder Case) दिवसाढवळ्या झालेल्या खून प्रकरणात आतापर्यंत पुणे पोलिसांनी 13 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी शुक्रवारी आणखी तिघांना अटक केली आहे. आदित्य गोळे (वय 24), नितीन खैरे यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी (12 जानेवारी) या तिघांना अटक केली आहे.
मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव
शरद मोहोळचा काटा काढण्यासाठी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केल्याचे सुद्धा समोर आले आहे. त्यावेळी आरोपी नितीन खैरे हा मुन्ना पोळेकरसह हजर होता. शरद मोहोळचा खून करण्यासाठी आरोपींनी एक महिन्यापूर्वी कट रचल्याचे समोर आले आहे. यासाठी पैशाची व्यवस्था नितीनने केली होती. आदित्यने बंदुकीसाठी पैसे पुरवले होते. तिसरा आरोपी सुद्धा फोनद्वारे आरोपींच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.
आरोपींची वकिलांबरोबर मीटिंग
दरम्यान, शरद मोहोळवर गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, तो यशस्वी ठरला नसल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही, तर त्यासाठी या गुन्ह्यातील इतर आरोपींची दोन्ही आरोपी वकिलांबरोबर बैठक सुद्धा झाल्याचे समोर आले आहे. ॲड. संजयने एका आरोपीबरोबर खून करण्यापूर्वी संभाषण झाल्याचे तपासात समोर आलं आहे. दोन्ही आरोपी वकिलांना खुनाची माहिती होती, असेही पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले. मोहोळच्या खून प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून दोन वकिलांना अटक करण्यात आली आहे.
शरद मोहोळची 5 जानेवारी रोजी हत्या
5 जानेवारी रोजी शरद मोहोळचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. साथीदार मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनीच गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर फरार होत असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून अटक केली होती.
शरद मोहोळ हत्याकांडात 'कराड' कनेक्शन कसं आलं?
दरम्यान, शरद मोहोळ हत्याकांड आता सातारा जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. कराडमधून एकाला उचलण्यात आलं असून हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्याचा संशय आहे. धनंजय मारुती वटकर (रा. कराड) असं अटक केलेल्याचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने हल्लेखोरांनी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर अटक केली होती. या गुन्ह्यात दोन वकीलांनाही अटक करण्यात आली आहे. चौकशीत शरद मोहोळवर गोळीबार करण्यासाठी पिस्तुल पुरवणारा कराडचा असल्याची माहिती समोर आली.
धनंजय वटकरवर अगोदरही गुन्हा
कराडमधून ताब्यात घेण्यात आलेल्या धनंजय वटकर याच्यावर यापुर्वी सुद्धा गुन्हे दाखल आहेत. ओगलेवाडी येथे मार्च 2023 मध्ये 14 पिस्तुलांसह 10 जणांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात वटकरचा सहभाग होता. पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्या गुन्ह्यामध्ये वटकरला जामिन मिळाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या