पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती, 3 जानेवारीला विनाहेल्मेट रॅली
हेल्मेट वापरण्याला विरोध नसून, सक्तीला विरोध असल्याचं हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच म्हणणं आहे. वाहतुकीच्या इतर नियमांचं पालन पुणेकर करत असून, हेल्मेट सक्तीतून मुक्तता द्यावी, अशी मागणी समितीने केली.
पुणे : दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांवर आजपासून कारवाई होणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी या आधीच हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. मात्र पुण्यातील विविध संघटना, संस्था आणि राजकीय पक्षांनी या हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध केला आहे.
हेल्मेटसक्ती विरोधात पुणेकर 3 जानेवारीला विनाहेल्मेट दुचाकी रॅली काढणार आहेत. पत्रकार संघ ते पुणे पोलीस आयुक्तालय अशी रॅली काढून आपलं विरोध प्रदर्शन करणार आहेत. रॅलीनंतर पुणे पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांना निवेदन दिले जाणार आहे. हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
हेल्मेट सक्तीला सुरुवातीपासूनच पुणेकरांचा विरोध होता. पोलीस आयुक्तांनी 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली तेव्हापासूनच पुणेकर आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. हेल्मेट सक्ती हटवण्यासाठी हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने पालकमंत्री गिरीश बापट यांनाही निवेदन दिलं होतं.
हेल्मेट वापरण्याला विरोध नसून, सक्तीला विरोध असल्याचं हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच म्हणणं आहे. वाहतुकीच्या इतर नियमांचं पालन पुणेकर करत असून, हेल्मेट सक्तीतून मुक्तता द्यावी, अशी मागणी समितीने केली.
संपूर्ण देशभरात सुमारे 35 हजार जणांचा मृत्यू हेल्मेट न घातल्याने झाल्याची धक्कादायक आकडेवारी काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन पुण्यात हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला आहे.